मुंबई : मुंबई विद्यापीठातून शिक्षण घेण्याची आणि विशेषतः येथून पीएच.डी पदवी मिळविण्यासाठी अनेक विद्यार्थी प्रयत्न करीत असतात. मात्र अपुऱ्या सुविधांमुळे आणि येथील योग्य मार्गदर्शनाअभावी अनेक भावी संशोधक आपल्या करिअरसाठी अन्य मार्ग निवडण्याच्या तयारीत असल्याचे चित्र मुंबई विद्यापीठात दिसत आहे.
पीएच .डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘पेट’ परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असते. मात्र ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे काय? असा प्रश्न मुंबई विद्यापीठातून पीएच.डी करणाऱ्यांना पडत आहे. पेट उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना तज्ज्ञ समितीपुढे मुलाखतीला सामोरे जावे लागते. यावेळी प्रस्ताव सादर करावयाचा असतो. त्याचबरोबर शीर्षक व शीर्षक मंजुरी मिळवणे यासाठी मार्गदर्शनाची गरज असते. या सर्व बाबी पूर्ण झाल्यानंतर मार्गदर्शक नियुक्त केला जातो. मात्र पुढील प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले मार्गदर्शन करण्यासाठी विद्यापीठाकडून कोणतीच यंत्रणा उभारण्यात आली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्या विभागामध्ये किती जागा आहेत, मार्गदर्शक (गाईड) किती आहेत, मार्गदर्शक व त्यांचे विषय, त्यांची नावे,मार्गदर्शकाकडे उपलब्ध जागा याची कोणतीच माहिती विद्यार्थ्यांना मिळत नाही.
महाविद्यालयांमध्ये असलेल्या पीएच.डी सेंटरबाबतही विद्यापीठाकडून माहिती उपलब्ध केलेली नाही. त्यामुळे सध्याच्या घडीला नवसंशोधकांची मुस्कटदाबी करून त्यांच्या संशोधनाची इच्छेला मारत असल्याचा आरोप युवासेना सिनेट सदस्य ॲड. वैभव थोरात यांनी केला आहे.
प्राध्यापकांना प्रोत्साहनाची गरज पीएच.डी करण्याकडे विद्यार्थ्यांचा ओघ वाढत आहे. परंतु मार्गदर्शकांची संख्या कमी पडत आहे. मार्गदर्शकांची संख्या वाढवण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेऊन प्राध्यापकांना प्रोत्साहन दिले पाहिजे. अनेक गुणवत्ता असलेले प्राध्यापक विद्यापीठाकडे आहेत. मात्र विद्यापीठाचा भोंगळ कारभार, वेळकाढूपणा धोरण, अंतर्गत राजकारण यामुळे प्राध्यापकांकडून मार्गदर्शक होण्यापासून दूर राहत आहेत. त्यामुळे विद्यापीठ चांगल्या मार्गदर्शकांना मुकत आहे.
‘महाविद्यालयांमध्ये पीएच.डी सेंटर सुरू करा’मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयामध्ये पीएच.डी सेंटरची संख्या वाढवण्यावर विद्यापीठाने भर देणे आवश्यक आहे. पीएच.डी सेंटर असलेल्या महाविद्यालयांना काही समस्या असल्यास त्यांचे निराकरण त्वरित करणेे, या केंद्राची माहिती विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर उपलब्ध करून देणे यावर भर देण्याबरोबर विद्यापीठाने विद्यार्थी पदवीचे शिक्षण घेत असतानाच त्यांना पीएच.डी बाबत मार्गदर्शन केल्यास अनेक नवसंशोधन निर्माण होण्याची शक्यताही थोरात यांनी व्यक्त केली.