कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपाच्या ‘क’ प्रभाग क्षेत्रातंर्गत वॉर्ड क्र.१९ दुधनाका या वॉर्डातही अंतर्गत रस्ते आणि दैनंदिन सफाईच्या समस्या नेहमीच्याच असल्याचे दिसते. या वॉर्डात दुधनाका जवळपासच्या सोसायट्या सोडल्या तर बहुतांश भाग हा स्लममध्ये मोडतो. तुटलेल्या गटारी, जागोजागी कचऱ्याचे ढीग या वॉर्डात पहावयास मिळतो. पायवाटा बनविल्या आहेत पण कित्येक ठिकाणी त्या तुटलेल्या अवस्थेत आहेत. या वॉर्डात काही ठिकाणी पिण्याचे पाणी कमी दाबाने येते असे सांगतात. दुधनाका असल्यामुळे रोज पहाटेपासून दूध विक्रेत्यांची आणि घेणाऱ्यांची रेलचेल पहावयास मिळते. पण त्या ठिकाणी सुविधांचा अभाव दिसतो. या वॉर्डात राममारुती चौक, गुप्ते चौक, हमालवाडी, घास बाजारचा काही परिसर, पारसी गल्ली, चौधरी मोहल्ला, अलमजीद, वरद विनायक, जगदंबा, गणेश्वर सप्तश्रृंगी, कोकण मर्चंटस या सोसायट्या बाजारपेठ येथे दैनंदिन साफसफाईच्या समस्या आहेत. रोजच येथील रहिवाशांना त्याच वातावरणात राहण्याची सवय झाल्याचे मनपा कर्मचाऱ्यांना कदाचित वाटत असल्यामुळे साफसफाई व कचरा उचलण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. काही ठिकाणी गटारी तर महिनोन्महिने साफ केल्या जात नाहीत. काही ठिकाणी तर कचरा कुंड्याच नसल्याचे दिसतो. पारनाका ते दुधनाका हा प्रामुख्याने गजबजलेला परिसर रोज हजारो लोकांची वर्दळ या रस्त्यावरून असते पण तो दुधनाका परिसरात अरुंद असल्यामुळे रहदारीच्या समस्या त्या ठिकाणी जाणवतात एखादे जड वाहन गेले तर रस्त्यावरील रहदारीच ठप्प होऊन जाते. शिवाय वॉर्डात उद्यान व खेळाचे मैदानच नसल्यामुळे अबालवृद्धांनी विरंगुळा कोठे करावा, हाच प्रश्न पडतो.
दुधनाका बनले समस्यांचे आगार
By admin | Published: June 27, 2015 11:33 PM