"समस्यांवर उपाय निघत नाही, तोवर वर्सोवा-विरार सागरी सेतू मार्गाचे बांधकाम स्थगित करा"
By मनोहर कुंभेजकर | Published: December 3, 2023 04:37 PM2023-12-03T16:37:53+5:302023-12-03T16:38:23+5:30
वेसावा कोळी जमात ट्रस्टची मुख्यमंत्र्यांना विनंती
मनोहर कुंभेजकर: मुंबई-वर्सोवा ते विरार सागरी सेतू मार्ग हा प्रकल्पकिना-यापासून १ ते २ किलोमिटर अंतरावर शासनामार्फत राबवण्यात येत आहे.परिणामी मच्छिमारांच्या अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.या सागरी मासेमारी क्षेत्रावर वेसावे गावातील असंख्य पारंपारिक मच्छिमार बिगर यांत्रिकी नौका अथवा आउटपबोट इंजिन असणाऱ्या दीडशेहून अधिक नौकांच्या आधारे चारशेहून अधिक पारंपरिक मच्छीमार आपला उदरनिर्वाह करतात.
वर्सोवा ते विरार सागरी सेतू मार्ग उभारून या सागरी क्षेत्रामध्ये मुंबईतील वाहतुकीचा ताण कमी करण्याबरोबर जलद आणि सुखकर विकास साधनेचे ध्येय प्रशासनाने आखले आहे. मात्र या विकासाच्या ध्येयामध्ये आम्हा मच्छीमारांना दुर्लक्षित केले असून या सागरी सेतूने वेसावे कोळीवाड्यातील मच्छिमार बांधव मोठ्या प्रमाणात बाधित होणार असून आमचे उदरनिर्वाहाचे साधन नाहीसे होण्याची भीती आहे.त्यामुळे जोपर्यंत आमच्या व्यथा आणि आमच्या समस्यांवर उपाय निघत नाही तोपर्यंत या सेतूचे बांधकाम स्थगित करावे आणि तात्काळ आम्हा मच्छीमारांचे हित जपणूक करुन नैसर्गिक उपजीविकेचा पारंपारिक मासेमारीचा हक्क शाबूत ठेवावेत अशी विनंती वेसावा कोळी जमात ट्रस्टचे अध्यक्ष राजहंस टपके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका पत्राद्वारे केला आहे.
वांद्रे वर्सोवा या सागरी सेतू मध्ये समुद्रात खांबावर आधारित रस्ता तयार करण्याबरोबर समुद्रकिनाऱ्यावर भराव करून पर्यावरण विध्वंसंबरोबर मासेमारी क्षेत्र नाहीशी केले आहे . त्यामुळे आम्हा मच्छीमारांचे उदरनिर्वाहाचे साधन हिरावले जात आहे. या सागरी सेतूने आमचा नैसर्गिक अधिकार आणि उपजीविकेचे साधन हे बाधित होत असल्याची कैफियत टपके यांनी आपल्या पत्रातून व्यक्त केली आहे.
वेसावा पारंपारिक मासेमारी हक्क परिषद
दरम्यान उद्या सोमवार दि, 4 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता श्री मसान देवी मंदिर येथे वांद्रे वेसावा सिलिंग विषयी वेसावे गावातील पारंपारिक मासेमारांची परिषद आयोजित केली आहे.यावेळी आमदार रमेश पाटील उपस्थित राहणार असून मरोळ मासळी बाजार मासळी विक्रेत्या संस्थेच्या अध्यक्ष राजेश्री भानजी या स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहे. वेसावा कोळी जमात ट्रस्टने ही परिषद आयोजित केली असल्याची माहिती राजहंस टपके व दक्षित टिपे यांनी दिली.