फास्टॅग स्कॅन करताना अडचणी; चालकांना दोनदा भरावे लागतात पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 05:40 AM2019-12-25T05:40:42+5:302019-12-25T05:41:06+5:30

वाहन मालक त्रस्त; तांत्रिक अडचणी सोडवून नंतरच प्रणाली कार्यान्वित करण्याची मागणी

Problems scanning a fastag; Drivers have to pay twice the money | फास्टॅग स्कॅन करताना अडचणी; चालकांना दोनदा भरावे लागतात पैसे

फास्टॅग स्कॅन करताना अडचणी; चालकांना दोनदा भरावे लागतात पैसे

googlenewsNext

मुंबई : सर्व प्रकारच्या वाहनांसाठी महामार्गावरील टोलनाक्यांवर फास्टॅगची १ डिसेंबरपासून सक्ती करण्यात आली आहे. मात्र वाहनावरील फास्टॅगचे स्कॅनिंग करताना वाहनचालकांना अडचणी येत आहेत. फास्टॅगचे स्कॅनिंग होत नसल्याने वाहनचालक पैसे भरून टोलची पावती घेतात. मात्र, वाहन मालकाच्या बँक खात्यातूनही ही रक्कम कापून घेण्यात येत असल्याच्या तक्रारी चालकांकडून करण्यात येत आहेत. म्हणजे टोलसाठी दोनदा पैसे भरावे लागत आहेत. याबाबत तक्रार केली तरी त्याची दखल टोलवर उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांकडून घेतली जात नसल्याचा आरोपही वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

याबाबत जय भगवान ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र वनवे म्हणाले, वाहनचालक जेव्हा टोलवर जातात तेव्हा कधीकधी फास्टॅग स्कॅन होत नाही. त्यामुळे वाहनचालक टोलची पावती घेतात. मात्र वाहन मालकांच्या बँक खात्यातूनही फास्टॅगचे पैसे जातात. मालकाच्या खात्यातून पैसे गेले हे वाहन चालकांना माहिती नसते. दुसरीकडे चालकाने पैसे भरले हे वाहन मालकाला समजत नाही. नाहक दोनदा पैसे जातात. जरी हे लक्षात आले तरी टोलनाक्यावर संबंधितांना सांगण्याचा प्रयत्न करताना वाद होतो. वेळ वाया जातो. वाहतूककोंडी होते. फास्टॅग प्रणालीत तांत्रिक अडचणी असून त्या दुरुस्त होईपर्यंत फास्टॅगची सक्ती करू नये, असे मत वनवे यांनी व्यक्त केले.
वाहन मालक जगन्नाथ गोल्हार यांनी सांगितले, मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरून जाताना माझ्या वाहन चालकाने फास्टॅग गाडीला लावला नव्हता. खेड-शिवापूर येथे टोलनाक्यावर त्याला पावती आकारण्यात आली. त्यापूर्वी माझ्या खात्यातून पैसे गेले होते. खेड-शिवपूर टोल नाक्यावर तक्रार केली असता अधिकाऱ्यांनी पैसे परत देण्यास नकार दिला. बँकेच्या कस्टमर केअरशी संपर्क साधण्यास सांगितले; पण तिथे कोणी फोन उचलत नाही. ई मेललाही उत्तर मिळाले नसल्याची खंत गोल्हार यांनी व्यक्त केली. तसेच तांत्रिक अडचणी सोडविल्यानंतरच ही प्रणाली कार्यान्वित करावी, अशी मागणी गोल्हार यांच्यासह अनेक वाहनचालक, मालकांकडून होत आहे.

फास्टॅग म्हणजे नेमके काय?
फास्टॅग म्हणजे एक डिजिटल स्टिकर. रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजीद्वारे हे स्टिकर काम करते. तुम्ही नॅशनल हायवेवरून प्रवास करत असाल आणि तुम्हाला टोल भरायचा असेल तर मग तुमच्याकडे फास्टॅग असणे गरजेचे आहे. कारच्या पुढच्या काचेवर हा टॅग लावावा लागतो. या टॅगद्वारे टोलनाक्यावर थेट टोल वाहन मालकाच्या खात्यातून घेतला जातो. त्यामुळे वाहनचालकाला रांगेत थांबण्याची गरज नसते. फास्टॅगमुळे होणारा सर्वांत मोठा फायदा म्हणजे यामुळे टोलनाक्यांवरची गर्दी कमी होईल. इतर प्रकारांनी टोल भरायचा असेल तर त्यासाठी दोन्ही बाजूंची प्रत्येकी एक लेन राखीव असते. या लेनला ‘हायब्रिड लेन’ असे म्हणतात.

Web Title: Problems scanning a fastag; Drivers have to pay twice the money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.