दक्षिण मुंबई बनलेय समस्यांचे आगार
By admin | Published: January 14, 2017 07:33 AM2017-01-14T07:33:54+5:302017-01-14T07:34:47+5:30
लोकसभा निवडणुकीपासून विधानसभा निवडणुकीत मुंबई शहरात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही चांगलेच धक्के बसले.
चेतन ननावरे / मुंबई
लोकसभा निवडणुकीपासून विधानसभा निवडणुकीत मुंबई शहरात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही चांगलेच धक्के बसले. मात्र महापालिका, विधानसभा आणि लोकसभेत सत्तेत वाटेकरी असलेल्या भाजपा आणि शिवसेनेला अद्याप शहरातील प्रश्न सोडवण्यात म्हणावे तेवढे यश मिळालेले नाही. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत विरोधक येथील कोणत्या प्रश्नांचे वाइल्ड कार्ड कशाप्रकारे वापरणार, यावरच निवडणुकीचा निकाल अपेक्षित आहे.
मराठी मतांसह हिंदूंच्या मतांवर डोळा ठेवत भारतीय जनता पार्टीने गेल्या १५ वर्षांपासून चर्चेत असलेल्या शिवस्मारकाच्या मुद्द्याला हात घातला. आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक तयार करण्याच्या दृष्टीने अरबी समुद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन आटपत भाजपाने शिवसेनेवर सरशी साधली आहे. मात्र स्मारकासाठी लागणारा निधी, कोळी बांधवांचा विरोध आणि पर्यावरण खात्याने अटींसह दिलेल्या तात्पुरत्या परवानग्या यावर विरोधकांना रान पेटवण्याची संधी आहे. याशिवाय शहरातील जुन्या चाळी आणि इमारतींचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. उभ्या मुंबईच्या तुलनेत सर्वाधिक धोकादायक इमारती शहरातील बी, सी, डी आणि ई वॉर्डमध्ये आहेत. त्यामुळे येथील मतदारांना भुरळ घालण्यासाठी आणि भाजपा-सेनेला कोंडीत पकडण्यासाठी विरोधी पक्षांना या मुद्द्याच्या रूपात चांगली संधी मिळाली आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सत्ता आल्यानंतरही येथे मूलभूत सुविधा पुरवण्यात भाजपा-सेनेला अपयश आले आहे. शहरात पाणी तुंबण्याच्या ठिकाणांत घट झाली असली, तरी गिरगावपासून रे रोड, शिवडी, वरळी भागांतील पाण्याची समस्या सोडवण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे.
शिवस्मारक कोणाला तारणार?
अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक तयार करण्याच्या नावाखाली भाजपा सरकारने भूमिपूजन आटोपले आहे. मात्र या ठिकाणी स्मारक उभारण्यास कोळी बांधवांनी कडाडून विरोध केला होता. कोळी बांधवांना तात्पुरते शांत केले असले, तरी अद्याप तो प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे स्मारकाची जागा आणि त्यासाठी लागणारा पैसा असे विविध प्रश्न समोर आले आहेत. परिणामी स्मारकाचा मुद्दा निवडणुकीत प्रत्येक पक्षाकडून सोयीनुसार वापरला जाईल.
मेट्रो-३ प्रकल्पातील खोडा
भाजपाच्या प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ या प्रकल्पावरून निवडणूक प्रचारात चांगलीच रंगत येईल. सेनेसोबत काँग्रेसनेही प्रकल्पाला विरोध केल्याने भाजपाच्या उमेदवारांना या ठिकाणी कडव्या आव्हानाला तोंड द्यावे लागेल. प्रकल्प झाल्यास येथील नागरिकांना वाहतूककोंडीतून सुटका मिळेल, अशी भुरळ घालण्याचा प्रयत्न भाजपा उमेदवारांकडून केला जाईल. तर नव्या प्रकल्पामुळे गिरगावातील मराठी माणूस स्थलांतरित होईल, शिवाय ऐतिहासिक हुतात्मा चौकाची जागा नष्ट होईल, अशी भीती शिवसेना आणि काँग्रेसकडून दाखवली जाईल.
मतांचे ध्रुुवीकरण कोणाच्या फायद्याचे?
मुंबई शहरात मराठी टक्का घसरत असतानाच मुस्लीम, उत्तर भारतीय आणि गुजराती मतदारांची संख्या वाढलेली दिसते. त्यामुळे प्रत्येक गटाला आपल्याकडे आकर्षित करण्याचा सर्वच पक्षांचा प्रयत्न असेल. त्यात प्रामुख्याने माझगाव, लालबाग, परळ, भायखळा येथील मराठी बहुल प्रभागांतील मतांचे विभाजन शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांसह भाजपामध्ये होईल. तर काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टी आणि एआयएमआयएम या पक्षांत मश्ीद बंदर, नागपाडा, भायखळा येथील मुस्लीमबहुल प्रभागांतील मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे.
राणीबागचा पुनर्विकास आणि पेंग्विन
आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणिसंग्रहालय उभारण्याच्या नादात रखडलेला वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणीबागचा पुनर्विकासाचा मुद्दा यंदाही गाजेल. त्यात दक्षिण कोरियाहून आणलेल्या एका पेंग्विनच्या मृत्यूचे प्रकरण आगीत तेलाची भूमिका पार पाडेल.
पार्किंगची डोकेदुखी भोवणार
महापालिकेत सत्तेवर असतानाही शिवसेना-भाजपाला दक्षिण मुंबईतील वाहतूककोंडी आणि पार्किंगचा मुद्दा अद्याप सोडवता आलेला नाही. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीसह मनसे आणि इतर घटक पक्षांना या मुद्द्यावर रान पेटवण्याची संधी आहे. याउलट पार्किंगच्या मुद्द्यावर सेना आणि भाजपाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
सफाई कामगारांचा पाठिंबा कोणाला?
शहरातील भायखळा, चिंचपोकळी, माझगाव, मशीद बंदर अशा विविध ठिकाणी सफाई कामगारांच्या वसाहती धोकादायक ठरवत त्यांना माहूलला स्थलांतरित केले जात आहे. महापालिकेच्या या भूमिकेमुळे शिवसेना आणि भाजपाविरोधात कामगारांत रोषाचे वातावरण आहे. मात्र सफाई कामगारांचे सांत्वन करण्यात विरोधी पक्षही पुरेसे पडत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे सफाई कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांची मते नेमकी कोणाच्या पारड्यात पडणार, यावर पुढील गणिते अवलंबून आहेत.
जुन्या इमारतींचा पुनर्विकास
दक्षिण मुंबईतील भेंडीबाजार, भायखळा, ना.म. जोशी मार्ग, माझगाव अशा विविध विभागांतील बऱ्याचशा इमारती धोकादायक परिस्थितीत उभ्या आहेत. त्यात बीडीडी, बीआयटी आणि म्हाडाच्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनात मोडत नसले तरी या मुद्द्यांमुळे निवडणुकीत रंगत येईल, यात शंका नाही.
पोर्ट ट्रस्टच्या जागेवरील रहिवाशांचा गुंता
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवरील झोपडपट्टी आणि इमारतींच्या पुनर्विकासाला अद्याप मार्ग सापडलेला नाही. भाजपाने याच मुद्द्यावर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मते गोळा केली होती. त्यामुळे महापालिका निवडणुकीतही पोर्ट ट्रस्टच्या जागेवरील रहिवाशांना पुनर्विकासाचे गाजर दाखवले जाईल.