सर्व्हरच बंद पडल्याने लसीकरणात अडचणी, ३६,७३८ जणांना लस - आरोग्य मंत्री टोपे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 08:24 AM2021-01-21T08:24:25+5:302021-01-21T08:25:54+5:30
लोकांच्या मनातली भीती घालविण्यासाठी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री लस का घेत नाहीत? टोपेंनी दिलं असं उत्तर
अतुल कुलकर्णी -
मुंबई : लसीकरणासाठी केंद्र सरकारने तयार केलेले ॲप नीट चालत नाही. शिवाय १८ ठिकाणी तर सर्व्हरच बंद पडले. त्यामुळे राज्यात लसीकरणाच्या मोहिमेत अडचणी येत आहेत. ज्यांनी लस घेतली, त्या व्यक्तीलादेखील ‘’लस घ्यायला या’’ असे मेसेज जात आहेत. तर ज्यांना लस अद्याप मिळाली नाही, त्यांना मेसेजच जात नाहीत, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
राज्यात पहिल्या दिवशी १८,५७२ जणांना, तर बुधवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत १८,१६६ जणांना लस देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी प्रतिव्यक्ती दोन डोस यानुसार १७ लाख लसींची गरज होती. मात्र, केंद्र सरकारकडून प्रत्यक्षात साडेनऊ लाख लसीचे डोस मिळाले आहेत. लसीकरण केंद्रांची संख्या ५११ वरून ३५८ अशी कमी केली. त्यातही फक्त २८५ केंद्रे सुरू करण्यासाठी मान्यता दिली. त्यातील १८ केंद्रे बंद पडली. सर्व्हरमध्ये येत असलेल्या तांत्रिक बिघाडाबाबत आम्ही केंद्रीय आरोग्य मंत्री, आरोग्य सचिव आणि संबंधितांना कल्पना दिली आहे. रोज किमान २६ हजार आरोग्यदूतांना लस मिळावी असे ठरविण्यात आले असले तरी तेवढे प्रमाण अद्याप गाठता आलेले नाही, असे टोप यांनी सांगितले.
आरोग्यमंत्री लस का घेत नाहीत?
- लोकांच्या मनातली भीती घालविण्यासाठी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री लस का घेत नाहीत? असा थेट सवाल केला असता टोपे म्हणाले, आम्हाला केंद्र सरकारने यादी दिली आहे. लस मिळाली तर आता या क्षणी घ्यायला आम्ही तयार आहोत.
- मात्र, आधी आरोग्यदूतांना लस द्यायची अशा सूचना आहेत. आमची नावे त्यात नाहीत. ज्यांची नावे केंद्राच्या यादीत आहेत आणि ज्यांना मेसेज येतात, त्यांना लस द्यावी, असे आदेश आहेत. घ्यायला सांगितली तर लस घेणारा पहिला मंत्री मी असेन.
लस सुरक्षित आहे
- सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पूनावाला यांनी स्वतः लस घेतली, तसे त्यांनी ट्विट केले, त्याचे काय? असे विचारले असता आरोग्यमंत्री म्हणाले, त्यांच्या संस्थेने लस बनवली आहे.
- ती सुरक्षित आहे की नाही असे प्रश्न उपस्थित होऊ लागल्यामुळे त्यांनी स्वतः घेतली. लस सुरक्षित आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला असावा, असेही टोपे म्हणाले.
- लस सुरक्षित आहे. तिचे कोणतेही अपाय होणार नाहीत, असा व्हिडिओ तयार करून सगळीकडे पाठवत आहे. त्यात मंत्री म्हणून मी लस का घेत नाही हे देखील सांगणार आहे, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.