कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न सोडविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:07 AM2021-07-07T04:07:30+5:302021-07-07T04:07:30+5:30

मुंबई : कोरोना महामारीच्या काळात कामगार पुढे आल्यामुळेच या संकटाचा समर्थपणे सामना करणे शक्य झाले. डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, ...

The problems of the workers will be solved through the Workers Welfare Board | कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न सोडविणार

कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न सोडविणार

Next

मुंबई : कोरोना महामारीच्या काळात कामगार पुढे आल्यामुळेच या संकटाचा समर्थपणे सामना करणे शक्य झाले. डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कामगार, पोलीस, नगर पालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद कर्मचारी, कारखाना कामगार यांच्यामुळे या महामारीला तोंड देणे शक्य होत आहे. राज्य सरकारच्या अधिकारात कामगार हितासाठी जे काही करणे शक्य आहे ते महाराष्ट्रात केले जाईल. याबाबत राज्य शासनाकडून नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवण्यात येतील आणि कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून कामगारांच्या गरजांकडे लक्ष देऊन त्यांचे प्रश्न सोडविले जातील, असे मत राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ६८व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी प्रभादेवी येथील हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कल्याण आयुक्त रविराज इळवे, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनीता वेद - सिंगल, असंघटित कामगार मंडळाच्या विकास आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, युनिसेफच्या मुख्य क्षेत्रीय अधिकारी राजेश्वरी चंद्रशेखर आदी मान्यवर उपस्थित होते.

केंद्र सरकारवर टीका करताना मुश्रीफ म्हणाले, केंद्राचे कायदे मालकधार्जिणे असून, त्यांनी कामगारांना वाऱ्यावर सोडले आहे. केंद्र सरकारला कामगार ही व्याख्याच नष्ट करायची आहे.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते महाकल्याण क्रीडा प्रबोधिनीचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी कल्याण आयुक्त रविराज इळवे म्हणाले की, मंडळातर्फे दरवेळी विविध क्रीडा प्रशिक्षण उपक्रम राबविले जातात. त्यांच्यात सुसूत्रता यावी, यासाठी महाकल्याण क्रीडा प्रबोधिनीची स्थापना केली आहे. या माध्यमातून खेळाडूंना एकाच छताखाली दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचा मंडळाचा मानस आहे.

युनिसेफच्या राजेश्वरी चंद्रशेखर म्हणाल्या की, महाराष्ट्रात ९० लाख कुशल कामगारांची आवश्यकता आहे. या कार्यक्रमात लोकमत व पी. डी. हिंदुजा हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिरात ३९ जणांनी रक्तदान केले. मंडळाच्या वाटचालीत मोलाचे योगदान दिल्याबद्दल शिवछत्रपती पुरस्कार विजेते पॉवरलिफ्टर सूर्यकांत गर्दे आणि टेबल टेनिस प्रशिक्षक गुरुप्रसाद पार्टे यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना साठे यांनी केले. सहाय्यक कल्याण आयुक्त माधवी सुर्वे यांनी आभार मानले.

Web Title: The problems of the workers will be solved through the Workers Welfare Board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.