विधायक कामासाठी पुढे या!
By admin | Published: December 13, 2015 01:41 AM2015-12-13T01:41:50+5:302015-12-13T01:41:50+5:30
‘प्रत्येक गोष्टीसाठी सरकारवर अवलंबून राहणे हे इंग्रजाच्या काळातील पारतंत्र्य आयुष्य जगण्यासारखे आहे. त्यामुळे समाजातील विधायक कामासाठी प्रत्येकाने स्वत: पुढाकार
मुंबई : ‘प्रत्येक गोष्टीसाठी सरकारवर अवलंबून राहणे हे इंग्रजाच्या काळातील पारतंत्र्य आयुष्य जगण्यासारखे आहे. त्यामुळे समाजातील विधायक कामासाठी प्रत्येकाने स्वत: पुढाकार घेणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी केले.
चतुरंग प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांना शनिवारी देण्यात आला, त्या प्रसंगी ते बोलत होते. रोख तीन लाख रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी न्या. चपळगावकर यांनी पुरस्कार विजेते प्रभुणे यांच्या कार्याचा तपशीलवार आढावा घेतला. ते म्हणाले,‘सध्या आपण प्रत्येक बाबतीत शासनाला जबाबदार धरतो. त्याबाबतची आपल्या जबाबदारीकडे सोईस्करपणे दुर्लक्ष करतो. विधायक गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वत: पुढाकार घेण्याची गरज आहे, तरच समाजात बदल घडून येईल.’ यावेळेस गिरीश प्रभुणे यांनीही मनोगत व्यक्त केले.
रंगली सुरेल मैफल आणि जुगलबंदी
पंडित रोणू मुजुमदार आणि गायक राहुल देशपांडे यांच्या अनोख्या जुगलबंदीचा आस्वाद ‘स्वरसागर’ या संगीत कार्यक्रमातून रसिकांनी घेतला. पंडित विश्वमोहन भट्ट यांच्या ‘नजराणा’ या अनोख्या संगीत मैफलीनेही श्रोत्यांना खिळवून ठेवले.
रसिक प्रेक्षकांची उपस्थिती: व्यासपीठावर डॉ. विनय सहस्त्रबुद्घे, डॉ. वीणा देव, अरुंधती प्रभुणे आदी उपस्थित होते. यावेळी चतुरंग प्रतिष्ठानच्या स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले. सूत्रसंचालन प्रदीप भिडे यांनी केले, तर विद्याधर निमकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला पुणे येथील गुरुकुलम शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.