Join us

रेशन दुकानदार बदलण्याची प्रक्रिया झाली सुलभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 4:08 AM

मुंबई : ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ योजनेंतर्गत ग्राहकांना रेशन कार्ड पोर्टिबिलिटीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार ...

मुंबई : ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ योजनेंतर्गत ग्राहकांना रेशन कार्ड पोर्टिबिलिटीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून धान्य दुकानदार बदलण्याची प्रक्रिया अत्यंत सुलभ झाली आहे. राज्यभरात गेल्या तीन महिन्यांत सात हजार ५३१हून अधिक ग्राहकांनी याचा लाभ घेतला आहे.

कोरोनाकाळात रोजगार गेल्याने हातावर पोट असणाऱ्या मजूर आणि कामगारवर्गाचे हाल झाले. उपासमार असह्य झाल्याने त्यांना स्थलांतर करावे लागले. अशावेळी त्यांना सरकारकडून अल्पदरात मिळणारे धान्य कोठेही घेता यावे, यासाठी रेशन कार्ड पोर्टिबिलिटी सुविधा लागू करण्यात आली. स्थलांतरितांसह बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना आणि धान्यवाटपाबाबत असमाधानी असलेल्या ग्राहकांना बिनदिक्कत दुकानदार बदलण्याचा पर्यायही यानिमित्ताने उपलब्ध झाला.

एखादा दुकानदार धान्य वितरणात काळाबाजार किंवा धान्य देण्यास आडेबाजी करीत असल्यास ग्राहकांना थेट दुकानदार बदलण्याची मुभा मिळाल्यामुळे आपल्या दुकानातील ग्राहक इतरत्र जाऊ नये यासाठी दुकानदारही ग्राहकांशी सौजन्याने व्यवहार करू लागल्याची प्रतिक्रिया एका रेशन कार्डधारकाने लोकमतशी बोलताना दिली.

नोव्हेंबरपर्यंत मिळणार मोफत धान्य

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे दुसऱ्या लाटेत निर्बंध लागू करताना राज्य सरकारने हातावर पोट असणाऱ्यांसाठी मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना नोव्हेंबरपर्यंत देशभरात सुरू ठेवण्याचा आदेश दिला. त्यानुसार अंत्योदय आणि बीपीएल लाभार्थींना मोफत धान्य योजनेचा लाभ घेता येईल.

मुंबईतील एकूण रेशन कार्डधारक

बीपीएल - २३ हजार ७९३

अंत्योदय - २० हजार ६१४

केशरी - ३२ लाख ५३ हजार २१४

किती जणांनी दुकानदार बदलला?

महिना...... राज्यांतर्गत..... राज्याबाहेर

मे...... ९१०...... १२१२

जून.... २८४५....... १४४९

१३ जुलैपर्यंत..... ८२६..... २८९

अशी असेल प्रक्रिया

- रेशन कार्ड पोर्ट करण्यासाठी आपल्या अधिकृत दुकानदाराकडे जावे लागेल. त्याला पोर्टिबिलिटीसाठी विनंती केल्यानंतर तो ‘इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल डिवाइस’च्या माध्यमातून व्हेरिफिकेशन करेल.

- यावेळी ग्राहकाकडे स्वतःचे रेशन कार्ड आणि आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. आधार क्रमांकाद्वारे व्हेरिफिकेशन केले जाते. बायोमेट्रिक पद्धतीने अंगठ्याचा ठसा जुळल्यानंतर दुकानदार पोर्टेबिलिटी प्रक्रिया पूर्ण करतो.

- अवघ्या काही वेळात आणि कोणत्याही अडथळ्यांविना रेशन कार्ड पोर्ट करता येते. त्यासाठी सरकारी कार्यालयांत खेपा घालण्याचीही गरज नाही.