मुंबई : नॅनोमटेरिअल क्षेत्रात आयआयटी बॉम्बेच्या संशोधकांकडून क्रांती घडविण्याचे प्रयत्न करण्यात आले असून, सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते सहज आणि सोप्या पद्धतीने शुद्ध करण्याची पद्धती शोधून काढली आहे. आयआयटी बॉम्बेच्या रसायनशास्त्र विभागात कार्यरत असलेले प्रा. सी. सुब्रमण्यम व त्यांच्या टीमने संशोधन केलेल्या या नॅनो कॉर्बन फ्लोरेटमुळे औद्योगिक सांडपाण्यातील तब्बल ९० टक्क्यांपर्यंतचे प्रदूषण कमी होऊन त्यातील आर्सेनिक, क्रोमियम, कॅडियम आणि पारा व क्षारयुक्त घटकही नष्ट करता येणार आहेत.औद्योगिक कंपन्यांमध्ये रासायनिक प्रक्रियेतून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यामुळे नदी, नाले व समुद्रातील पाणी मोठ्या प्रमाणात दूषित होते.
त्यामुळे औद्योगिक कंपन्यांमधील पाणी शुद्ध करण्याचे मोठे आव्हान देशातील सर्वच कंपन्यांसमोर आहे. मात्र आयआयटी बॉम्बेच्या टीमने केलेल्या नॅनो कॉर्बन फ्लोरेटच्या संशोधनामुळे आता सांडपाण्यावरील प्रक्रिया सोपी होणार आहे. नोकार्बन फ्लोरेट हे केमिकल व मॅकेनिकद्ष्ट्या कोणत्याही तापमानात तग धरून राहू शकतात. त्यामुळे हे पाण्यातील दूषितपणा दूर करण्यासाठी योग्य ठरले आहे. आर्सेनिक, क्रोमियम, कॅडियम व पारा हे धातू कर्करोगासारखा महाभयंकर आजार होण्यास कारणीभूत ठरतात. तसेच हे घटक फार काळ वातावरणात राहिल्यास पर्यावरणासाठीही ते घातक ठरतात. नॅनोमटेरियलने संशोधन क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणली आहे.
मेडिसिन, इलेक्ट्रॉनिक्स बायोकॅम्पटिबल मटेरियल यामध्ये नॅनोमटेरियलमुळे संशोधनाला चालना मिळाली आहे. शास्त्रज्ञांनी आतापर्यंत नॅनोमटेरियलच्या कार्बन श्रुंखलेत नॅनोट्युब्स, नॅनोकोन्स, नॅनोहॉर्न, कॉर्बन ओनियन यासारख्या प्रकारांवर संशोधन केले आहे. यामध्ये आता आयआयटी मुंबईतील शास्त्रज्ञ प्रा. चांद्रमोळी सुब्रमण्यम आणि त्यांच्या टीमने नॅनो कार्बनचा आणखी एक प्रकार शोधून काढला आहे. ‘नॅनो कॉबर्न फ्लोरेट’ असे त्याचे नाव आहे. नॅनो कार्बन फ्लोरेटचा आकार झेंडूच्या फुलासारखा आहे. नॅनो कॉर्बन फ्लोरेटमुळे औद्योगिक सांडपाण्यातील घातक असे धातू काढण्यास मदत होणार असल्याने पर्यावरण वाचविण्यासाठी हा घटक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हे संशोधन ‘एसीएस जर्नल’मध्ये प्रकाशित केले आहे.
औद्योगिक पातळीवर नॅनो कार्बन प्लोरेट फिल्टरमुळे मोठी क्रांती होण्यास मदत होईल. त्यामुळे रासायनिक कंपन्यांना पाणी शुद्धीकरणावर करावा लागणारा खर्च कमी होणार आहे. या संशोधनाचे आम्ही पेटंट घेण्याचे व फिल्टरचे व्यावसायिकीकरण करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत, असे प्रा. चांद्रमोळी सुब्रमण्यम यांनी स्पष्ट केले.पाण्याच्या घनतेत वाढ होऊन पाणी शुद्ध होतेऔद्योगिक सांडपाण्यातील रसायनांचा मारा, धातू वेगळे करणे, इलेक्ट्रोकेमिकल घटक कमी करणे यासाठी आतापर्यंत वापरण्यात येत असलेल्या विविध पद्धतींपेक्षा ही पद्धत फारच सोपी आणि आर्थिकदृष्ट्याही सोयीस्कर आहे. सुब्रमण्यम व त्यांच्या टीमने नॅनो कार्बन फ्लोरेटच्या माध्यमातून विशिष्ट प्रकारचे फिल्टर तयार केले आहे. या फिल्टरमधून पाणी गेल्यानंतर त्यातील आर्सेनिक, क्रोमियम, कॅडियम आणि पारा व क्षारयुक्त घटक हे ९० टक्क्यांपर्यंत कमी होतात. त्यामुळे ते पाणी अन्य वापरासाठी वापरण्यास उपयुक्त ठरते. तसेच पाण्याच्या घनतेमध्येही मोठ्या प्रमाणात बदल होऊन पाणी शुद्ध होते.