लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई ( Marathi News ): राज्यात कोरोना पुन्हा डोके वर काढत असताना सार्वजनिक आरोग्य विभागाने आधीचा टास्क फोर्स रद्द करून नवीन टास्क फोर्सची स्थापना केली आहे. आरोग्य क्षेत्रात संशोधन करणाऱ्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर अध्यक्षपदी असतील असे समजते.
२०२० च्या एप्रिल महिन्यात कोरोनाच्या थैमानाला सुरुवात झाली. त्यावेळी राज्य सरकारने डॉ. संजय ओक यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स नेमला होता. कोरोनाच्या रुग्णसंख्येला नियंत्रणात आणण्यासाठी टास्क फोर्सने मोलाची भूमिका बजावली होती. त्यामुळे आता नव्याने रुग्ण सापडू लागल्याने आरोग्य विभागाने पुन्हा टास्क फोर्सची पुनर्रचना करण्याचे काम सुरू केले आहे. आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या टास्क फोर्सच्या सदस्यपदी १७ पेक्षा अधिक सदस्य असण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे संचालक डॉ. दिलीप मैहसेकर, मुंबई महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह या फोर्समध्ये सदस्य म्हणून असतील. तसेच, पुणे येथील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे वरिष्ठ तज्ज्ञ, ससून रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्र तज्ज्ञ, कम्युनिटी मेडिसिन विभागातील तज्ज्ञ आणि अन्य काही सदस्यही यात असतील, असे समजते.
राज्यात ३५, तर मुंबईत १८ नवीन रुग्ण
राज्यात कोरोनाचे नवे रुग्ण आढळत आहेत. सध्या राज्यात १०३ सक्रिय रुग्ण आहेत. शनिवारी राज्यात ३५ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबई - १८, ठाणे पालिका क्षेत्र -४, कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्र -१, रायगड-१, पनवेल -१, पुणे पालिका क्षेत्र-६, पिंपरी चिंचवड पालिका क्षेत्र-१, सातारा - २, सांगली -१, सांगली, मिरज, कुपवाड पालिका क्षेत्र -१,