मुंबई : तीन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर फेरीवाला शहर नियोजन समिती स्थापन झाल्यामुळे फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीला वेग आला आहे. फेरीवाल्यांना बसण्यासाठी पालिकेने ८९ हजार ७९७ जागा निश्चित केल्या आहेत. मात्र यावर अंतिम निर्णयापूर्वी पालिकेने नागरिकांकडून हरकती-सूचना मागविल्या आहेत. त्यावरही सुनावणी झाल्यानंतरच या जागांवर शिक्कामोर्तब होणार आहे.मुंबईत परवानाधारक १५ हजार फेरीवाले आहेत. महापालिकेने फेरीवाल्यांसाठी यापूर्वी २२ हजार ९७ इतक्या जागा निश्चित केल्या होत्या. मात्र फेरीवाल्यांची संख्या वाढत गेल्याने आता एकूण ८९ हजार ७९७ जागांचे वाटप होणार आहे. या जागांची यादी पालिकेच्या संकेतस्थळावर टाकण्यात आली आहे. ही यादी अंतिम करण्यासाठी हरकती-सूचना मागविल्या आहेत.२०१४मध्ये पालिकेने फेरीवाल्यांकडून अर्ज मागविले होते. त्यानुसार एकूण ९९ हजार ४३५ अर्ज आले आहेत. या अर्जदारांची पात्रता निश्चित झाल्यानंतर ८९ हजार ७९७ फेरीवाल्यांचे नशीब खुलणार आहे. मात्र त्यांची नियुक्ती पात्र-अपात्रता प्रक्रियेनंतर केली जाणार आहे.जाहीर करण्यात आलेल्या या यादीमधील प्रस्तावित काही रस्त्यांबाबत नागरिकांकडून तक्रारी येत असल्याने काही रस्त्यांवर नियोजित फेरीवाला क्षेत्र वादात अडकण्याची शक्यता आहे.समितीत २० सदस्यांचा समावेशपालिकेने नुकतीच शहर फेरीवाला नियोजन समितीची स्थापना केली. या समितीमध्ये २० सदस्यांचा समावेश असून फेरीवाला संघटनेच्या आठ सदस्यांचा यात समावेश आहे.रेल्वे स्थानक आणि मंड्यांपासून दीडशे मीटर व रुग्णालये, शाळा, मंदिरांपासून शंभर मीटर अंतर परिसरात फेरीवाल्यांनी बसू नये, असा नियम आहे. मात्र या नियमांची अंमलबजावणी केली जात नाही.एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर मुंबईतील फेरीवाल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला. मनसेने फेरीवाला हटाव मोहीम सुरू केली आहे. त्याचवेळी पालिकेने फेरीवाल्यांवरील कारवाई तीव्र केली आहे.
फेरीवाला निवडीची प्रक्रिया अखेर सुरू, पालिकेने मागविल्या हरकती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 3:03 AM