Join us

कृषी-पर्यटन केंद्रे स्थापन करण्याची प्रक्रिया सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 4:05 AM

मुंबई : कृषी - पर्यटनाशी संबंधित सर्व विभागांशी बातचीत सुरू आहे. लवकरच सगळ्या ...

मुंबई : कृषी - पर्यटनाशी संबंधित सर्व विभागांशी बातचीत सुरू आहे. लवकरच सगळ्या संबंधित विभागांकडून अध्यादेश जारी करून कृषी-पर्यटन केंद्रे स्थापन करण्याची प्रक्रिया सुरळीत करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असून, नुकतेच ८६ नवोदित कृषी पर्यटन केंद्रांचे अर्ज आम्ही मंजूर केले आहेत, अशी माहिती शासनाच्या पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी जागतिक कृषी पर्यटन परिषदेत दिली.

जागतिक कृषी पर्यटन दिना निमित्त कृषी पर्यटन विकास संस्था यांनी शासनाच्या पर्यटन संचालनालयाच्या सहाय्याने जागतिक कृषी पर्यटन परिषद २०२१चे आभासी माध्यमाद्वारे आयोजन केले होते. यंदाच्या परिषदेत कृषी पर्यटन - महिला शेतकरी उद्यमशीलता विकास असे मध्यवर्ती विषयसूत्र निश्चित करण्यात आले होते.

धनंजय सावळकर म्हणाले, कमीत कमी प्रशासकीय नियत्रंण ठेवून हे धोरण यशस्वीपणे राबवण्याचा आमचा प्रयत्न आहे. इच्छुक शेतकऱ्यांना आतिथ्य, विपणन इत्यादीसाठी मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्या-त्या प्रांतातील एक आदर्श कृषी-पर्यटन केंद्र निवडून तेथे नोंदणीकृत अर्जदारांना प्रात्यक्षिक देण्यात येईल. पर्यटन विभागाच्या व्यवसाय प्रशिक्षण / मूल्यमापन सहलींमध्ये आदर्श कृषी - पर्यटन केंद्रांना समाविष्ट करता येईल. या परिषदेमुळे प्रेरित होऊन शेतकरी बांधव व भगिनी कृषी पर्यटन केंद्रांसाठी नोंदणी करतील. शिवाय सुप्रसिद्ध पर्यटन स्थळे, जिथे किफायतशीर दरात निवास व्यवस्था मिळणे अवघड असते, अशा ठिकाणी अथवा जिथे निवास व्यवस्था मिळणे दुरापास्त असते. अशा किल्ल्यांचे पायथे यांसारख्या मुख्य प्रवाहापेक्षा वेगळ्या ठिकाणी पहिल्या टप्प्यातील कृषी पर्यटन केंद्र चालू करणे जास्त लाभदायक ठरेल.