मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या निलंबनाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी दिली. सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांच्या भेटीमुळे उद्भवलेल्या वादंगावर गृहमंत्री म्हणाले की, ही भेट अत्यंत चुकीची आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरच अशी भेट घेता येते. मात्र अशी कुठलीही परवानगी नसताना ही भेट झाली आहे. या भेटीबाबत चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकार आपले काम करत आहे, असे सांगत गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले की, परमबीर सिंग मुंबईत परतल्यानंतर त्यांनी त्याबाबत सरकारला कळवलेले नाही. तसेच त्यांनी होमगार्डच्या महासंचालक पदाचा पदभारही स्वीकारलेला नाही. तसेच परमबीर सिंग यांना न्यायालयाने फरारही घोषित केले होते. असे असतानाही त्यांना शासकीय गाडी आणि इतर शासकीय सुविधा कशा दिल्या गेल्या याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या प्रकारे ते गाडीचा वापर करत आहेत ते चुकीचे आहे. ते कामावर नाहीत. त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत. तरीदेखील ते गाडी वापरत आहेत. हे चुकीचे आहे आणि याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.