केईएममध्ये दुर्मीळ हृदयविकारावर झाली ‘प्रोसिजर’

By admin | Published: September 29, 2016 03:56 AM2016-09-29T03:56:30+5:302016-09-29T03:56:30+5:30

पाच टक्क्यांहून कमी प्रमाणात येणाऱ्या दुर्मीळ हृदयविकाराच्या झटका आल्यामुळे, मुंबईतील एका महिलेचा जीव धोक्यात होता. परळ येथील केईएम रुग्णालयाच्या हृदयविकार

The 'processor' on the rare heart attack in KEM | केईएममध्ये दुर्मीळ हृदयविकारावर झाली ‘प्रोसिजर’

केईएममध्ये दुर्मीळ हृदयविकारावर झाली ‘प्रोसिजर’

Next

- पूजा दामले,  मुंबई

पाच टक्क्यांहून कमी प्रमाणात येणाऱ्या दुर्मीळ हृदयविकाराच्या झटका आल्यामुळे, मुंबईतील एका महिलेचा जीव धोक्यात होता. परळ येथील केईएम रुग्णालयाच्या हृदयविकार विभागातील डॉक्टरांनी मोफत ‘प्रोसिजर’ करून, ‘एमआय व्हीएसडी क्लोजर डिवाईस’ (छतीच्या आकाराचे डिवाईस) बसवून त्या महिलेचा जीव वाचविला असून, आता ही महिला आता सामान्य आयुष्य जगत आहे.
सांताक्रुझ येथे राहणाऱ्या तारामती (६२) नामक महिलेला तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांच्या हृदयाचा पडदा फाटला होता. त्यामुळे हृदयाच्या खालच्या दोन कप्प्यांतील रक्त मिसळले जात असल्याने, त्यांचे हृदय निकामी होण्याचा धोका वाढला होता. छातीत भरून आल्यासारखे वाटू लागल्याने तारामती डॉक्टरांकडे गेल्या. त्या वेळी अ‍ॅसिडिटीचा त्रास असल्याचे निदान करून औषधोपचार सुरू करण्यात आले, पण या औषधांमुळे त्यांचा त्रास कमी होत नव्हता. त्यातच तारामती यांना दम लागायला लागला. पाच दिवसांनी त्यांना हालचाल करणे, झोपणे असह्य झाले. त्या वेळी तारामती यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
केईएमच्या हृदयविकार विभागातील डॉक्टरांनी तारामती यांची तपासणी केली, त्या वेळी त्यांना दुर्मीळ हृदयविकाराचा झटका पाच दिवसांपूर्वी येऊन गेल्याचे निदान झाले. वेळीच योग्य उपचार न झाल्याने, मूत्रपिंड आणि यकृताच्या कार्यावर परिणाम झाल्याचे स्पष्ट झाले. अशा प्रकारच्या हृदयविकाराचा झटका आल्यावर शस्त्रक्रिया करणे जिकरीचे असते. त्यामुळे या महिलेवर बिनटाक्याची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.
शुक्रवारी तपासण्या झाल्यावर तत्काळ राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून, प्रोसिजरसाठी लागणारी आर्थिक मदत मिळावी, म्हणून प्रक्रिया पूर्ण केली. त्याच वेळी प्रोसिजरसाठी लागणारे ‘एमआय व्हीएसडी डिवाइस’ अहमदाबादवरून मागवण्यात आले. तारामती यांची प्रकृती नाजूक आणि गंभीर असल्याने बिनटाक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर, आठवड्याभरात त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तीन आठवड्यांनीही त्यांची तपासणी नॉर्मल आली असून, आता त्या सामान्यपणे आयुष्य जगत असल्याची माहिती हृदयविकार विभाग प्रमुख डॉ. प्रफुल्ल केरकर यांनी ‘लोकमत’ला दिली.

या डॉक्टरांनी केली प्रोसिजर!
केईएम रुग्णालयातील हृदयविकार विभाग प्रमुख डॉ. प्रफुल्ल केरकर, डॉ. चरण लांजेवार, डॉ. हेतन शाह, डॉ. अंकुर फातर्पेकर, डॉ. देवेंद्र पाटील, डॉ. जिवतेश पातवा या डॉक्टरांच्या चमूने अ‍ॅन्जिओप्लास्टीची प्रोसिजर केली.

तीव्र हृदयविकाराचा झटका आल्यावर हृदयाचा पडदा फाटणे हे अत्यंत दुर्मीळ आहे. अशा प्रकारे हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण पाच टक्क्यांहून कमी आहे. या प्रकारच्या झटका आल्यावर पुढच्या तीन आठवड्यांत ६० ते ७० टक्के जणांचा मृत्यू होतो. तारामती यांचा हृदयाचा पडदा फाटल्याने खालच्या दोन कप्प्यांतील रक्त मिसळत होते. हे छिद्र शिवणे अत्यंत कठीण असते. अनेकदा टाके घालताना पडदा अधिक फाटू शकतो. त्यामुळे त्यांच्या मानेतून आणि जांगेच्या नसेतून कॅथेटर सोडण्यात आले आणि त्यानंतर एक छत्रीच्या आकाराचे डिवाइस प्रोसिजरद्वारे बसण्यात आले. त्यामुळे पडद्याचे छिद्र बंद झाल्याने या महिलेच्या हृदयाचे, मूत्रपिंडाचे आणि यकृताचे कार्य सामान्यपणे सुरू झाले आहे.
- डॉ. प्रफुल्ल केरकर, हृदयविकार विभाग प्रमुख, केईएम रुग्णालय

Web Title: The 'processor' on the rare heart attack in KEM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.