निर्माती प्रेरणा अरोराने घोटाळ्यातील आठ कोटी उडवले शॉपिंगवर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 04:20 AM2019-03-07T04:20:44+5:302019-03-07T04:20:51+5:30
प्रेरणा अरोरा हिने चित्रपटनिर्मितीदरम्यान केलेल्या १६ कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारातील आठ कोटी रुपये तिने खरेदीवर उडविल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
मुंबई : ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’, ‘पॅडमॅन’ अशा आशयघन चित्रपटांची निर्माती प्रेरणा अरोरा हिने चित्रपटनिर्मितीदरम्यान केलेल्या १६ कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारातील आठ कोटी रुपये तिने खरेदीवर उडविल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शिवाय तिला तिच्या वाढदिवशीच अटक केल्याची बाब आर्थिक गुन्हे शाखेने नुकत्याच दाखल केलेल्या आरोपपत्रातून समोर आली आहे.
आर्थिक गुन्हे शाखेने आर्थिक घोटाळाप्रकरणी प्रेरणाविरोधात
१ हजार १७६ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. यात तिच्या वडिलांच्या जबाबाचा समावेश आहे. मूळची उत्तर प्रदेशची रहिवासी असलेली अरोरा हिचा जन्म ८ डिसेंबर १९७९ रोजी झाला. बारावी पास झाल्यानंतर तिला चित्रपटात काम करण्याचे वेध लागले. त्यानुसार, तिने तयारी सुरू केली. चित्रपटात काम करण्यासाठी वय कमी असायला हवे, म्हणून सुरुवातीला तिने खोटे जन्मदाखले तयार केले. तिच्याकडून २ जन्मदाखले ताब्यात घेण्यात आले. त्यातील एकात तिने स्वत:चे जन्मवर्ष १९८३ तर दुसऱ्या दोघांत १९८६ असे नमूद केले होते.
आर्थिक घोटाळ्याप्रकरणी तिला ८ डिसेंबर रोजी अटक करण्यात होती. त्याच दिवशी तिचा वाढदिवस होता. क्रिअर्ज एंटरटेन्मेंट’ ही प्रेरणाची निर्मिती संस्था असून, या बॅनर अंतर्गत तिने काही प्रसिद्ध चित्रपटांची निर्मिती केली आहे. १६ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप तिच्यावर आहे. याआधीही प्रेरणावर आर्थिक फसवणुकीचे बरेच आरोप करण्यात आले होते. यातील फसवणुकीच्या रकमेपैकी जवळपास ८ कोटी रुपये तिने खरेदीवर उडविल्याची धक्कादायक माहिती समोर येत
आहे.
अरोरा हिने खंडाळ्यात आलिशान बंगला घेण्यासाठी यापैकी सुमारे ३ कोटी रुपये खर्च केल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या आरोपपत्रातून स्पष्ट झाले आहे. त्यातही धक्कादायक बाब म्हणजे फक्त खरेदीवर तिने ५ कोटी रुपये ब्रॅण्डेड कपडे, पर्स, हॅण्डबॅग, पादत्राणे, अत्तरे, गॉगल व सौंदर्यप्रसाधने यांवर उडविले. असे एकूण ८ कोटी रुपये फक्त घरासह अन्य शॉपिंगवर तिने उडविले आहेत. ३९ - ४० तर शूजच्या जोड्या घेतल्या आहेत. प्रेरणाने सुरक्षारक्षकाला जास्त वेळ थांबून राहण्यासाठी त्याचा पगारही १६ हजारांवरून थेट ५० हजार रुपये केला होता.
>काय आहे प्रकरण?
प्रेरणा अरोराला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने डिसेंबर २०१८ मध्ये अटक केली होती. तिच्यावर कोट्यवधींच्या गैरव्यवहारांचा आरोप आहे. फिल्म डिस्ट्रिब्युटर वासू भगनानींनी प्रेरणा आणि तिच्या संस्थेविरोधात तक्रार दाखल केली होती. फिल्म ‘फन्ने खां’मध्ये आपल्याला डिस्ट्रिब्युटर म्हणून क्रेडिट देण्यात आले नाही. तसेच प्रेरणाने आपले नाव वगळून कराराचे उल्लंघन केले, असा आरोप त्यांनी केला.