मुंबई : पर्यावरण वाचवण्याचा संदेश देणाऱ्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना पर्यावरणप्रेमींकडून दरवर्षी चांगली मागणी असते. यंदा कोरोनामुळे गणेशोत्सवावरही सावट आलेले आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची मागणी वाढू लागली आहे. याचाच एक भाग म्हणून रिंटू राठोड यांनी चॉकलेटच्या गणपतीची निर्मिती केली आहे. तसेच यावर्षी घरोघरी अशा प्रकारच्या गणेशमूर्ती बनवता याव्यात याकरिता त्या विनामूल्य प्रशिक्षणही देणार आहेत. गणेशोत्सवाच्या काही दिवस अगोदर हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या संकल्पनेबाबत बोलताना राठोड म्हणाल्या की, सध्या कोरोनामुळे जग बदललेले असल्याने गणपतीच्या भक्तीचा प्रकारही बदलत आहे. चॉकलेटपासून बनवण्यात येणाºया या गणेशमूर्तीचे विसर्जन पाण्याऐवजी दुधात करता येते व दुधात विरघळलेले चॉकलेट प्रसाद म्हणून भाविकांना देता येईल. जगभरातील ३२ देशांतील १६०० जणांनी या संकल्पनेसाठी उत्सुकता दर्शवली असून त्यासाठीच्या विनामूल्य आॅनलाइन प्रशिक्षणासाठी नोंदणी केल्याची माहिती राठोड यांनी दिली.
यावर्षी भाविकांनी स्वत: चॉकलेटची पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घरी तयार करावी. तसेच या कोरोना कालावधीतील सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून घरीच या गणेशमूर्तीचे विसर्जन करावे, असे आवाहन राठोड यांनी केले आहे.