निर्माल्यातील झेंडूपासून नैसर्गिक खाद्यरंगाची निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 04:15 AM2019-11-17T04:15:05+5:302019-11-17T06:33:06+5:30

आरोग्यालाही अपायकारक नाही; जिल्हास्तरीय बालविज्ञान परिषदेत प्रकल्प सादरीकरण

Production of natural food from the marigold | निर्माल्यातील झेंडूपासून नैसर्गिक खाद्यरंगाची निर्मिती

निर्माल्यातील झेंडूपासून नैसर्गिक खाद्यरंगाची निर्मिती

Next

- सीमा महांगडे 

मुंबई : सण, उत्सवांसाठी झेंडूच्या फुलाला मोठी मागणी असते, परंतु सण, उत्सव आटोपल्यानंतर ही झेंडूची फुले निर्माल्याच्या रूपात एकत्र केली जातात. मग या निर्माल्यातील झेंडूच्या टाकाऊ फुलांचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. मात्र, याचा वापर करून नैसर्गिक खाद्यरंग तयार करता येऊ शकतो. हा खाद्यरंग अन्नपदार्थात आपण वापरू शकतो आणि तो नैसर्गिक असल्याने आरोग्यालाही अपायकारक नसल्याचा प्रकल्प जोगेश्वरीच्या गंडभीर शाळेच्या विद्यार्थिनींनी जिल्हास्तरीय बालविज्ञान परिषदेत सादर केला. माटुंग्यात शनिवारी आयोजित जिल्हास्तरीय बालविज्ञान परिषदेत टाकाऊतून समृद्धी या विषयांतर्गत या प्रकल्पाचे सादरीकरण केले. शालेय विद्यार्थ्यांत मूलभूत विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, हे या परिषदेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचा या वर्षीचा ‘स्वच्छ, हरित आणि आरोग्यसंपन्न देशासाठी : विज्ञान, तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण कल्पना’ हा मुख्य विषय आहे. परिसंस्था आणि परिसंस्थाविषयक सेवा, आरोग्य, स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छता व्यवस्था, टाकाऊतून समृद्धी ऊर्जा, समाज, संस्कृती आणि राहणीमान, परंपरागत ज्ञानव्यवस्था हे याचे उपविषय आहेत. दसरा, दिवाळी, लग्नसराई कालावधीत झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. त्याप्रमाणे बाजारात फुलेही उपलब्ध होतात, परंतु दुसऱ्या दिवशी या फुलांना शून्य किंमत असते. मग प्रश्न पडतो की, या फुलांचा काही उपयोग करता येईल का?, या विचारातून या प्रयोगाचा पाया रचला गेला. फक्त सणांसाठी फुले या ऐवजी जर शेतकऱ्यांनी पिकाची मूल्यवर्धित उपयोगिता लक्षात घेऊन त्यावर आधारित व्यवसाय केला, तर त्याचे होणारे नुकसानही टळेल व त्याला जास्त फायदा होऊ शकेल. यातूनच झेंडूपासून विविध समाजोपयोगी ईकोफ्रेंडली मूल्यवर्धित उत्पादने तयार करता येतील का, यावर या गंडभीर शाळेच्या विद्यार्थिनी गौरी कोकाटे व मानसी शिंदे यांनी शाळेच्या प्रयोगशाळेत शिक्षकांच्या मदतीने संशोधन केले.

असे तयार होते खाद्यपदार्थांसाठी रंगद्रव्य!
निर्माल्यातील झेंडूच्या फुलांवर पेव्हर ब्लॉकच्या वजनाएवढे वजन काही दिवस ठेवल्यानंतर त्यांच्या वजनात सुरुवातीला घट होते. ही घट झाल्यानंतर या फुलांमधून रंगद्रव्य मिळते. या रंगद्रव्याचे प्रमाण निश्चितच ताज्या फुलांमधून मिळणाऱ्या रंगद्रव्यापेक्षा कमी असते. त्यानंतर, या रंगद्रव्यात इथाईल एसिटेटचा वापर करून या मिश्रणावर गाळण प्रक्रिया करण्यात येते. प्रयोगशाळेत यंत्राचा वापर करून केलेल्या या प्रक्रियेनंतर खाद्यपदार्थांसाठी योग्य असे रंगद्रव्य मिळत असल्याची माहिती या विद्यार्थिनींनी दिली.

Web Title: Production of natural food from the marigold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.