Join us

प्रा. वामन केंद्रे यांची 'मॅजिक ॲाफ ॲक्टींग  २' नि:शुल्क कार्यशाळा

By संजय घावरे | Published: December 27, 2023 6:59 PM

'अभिनयाची जादू' या विषयावरील हि नि:शुल्क कार्यशाळा ६ ते ८ जानेवारी २०२४ या कालावधीत दादर येथील राजर्षी शाहू सभागृहात भरणार आहे.

मुंबई - नाट्य दिग्दर्शक-प्रशिक्षक, एनएसडीचे माजी संचालक व राष्ट्रीय पुरस्कार विजेते पद्मश्री प्रा. वामन केंद्रे यांनी 'मॅजिक ॲाफ ॲक्टींग २' या दुसऱ्या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. 'अभिनयाची जादू' या विषयावरील हि नि:शुल्क कार्यशाळा ६ ते ८ जानेवारी २०२४ या कालावधीत दादर येथील राजर्षी शाहू सभागृहात भरणार आहे.

रंगपीठ थिएटर आणि श्री छत्रपती शिवाजी स्मारक ट्रस्ट मुंबईच्या वतीने आयोजित करण्यात आलेली हि कार्यशाळा सायंकाळी ६.३० ते ९.३० या वेळेत शनिवार, रविवार व सोमवारी होणार आहे. यात १६ ते ५५ वर्ष वयोगटातील कलांवतांना सहभागी होता येईल. या कार्यशाळेत अभिनयाची जादू काय असते व या क्षेत्रात भविष्य घडविण्यासाठी काय करावे लागते या विषयीचे प्रात्यक्षिकांसह सविस्तर मार्गदर्शन केले जाईल. नाटक, चित्रपट, दूरदर्शन, जाहिरात, वेब सिरिज, नाट्य व अभिनय प्रशिक्षण, अभिनय संशोधन आदि माध्यमांमध्ये करिअर करण्यासाठी काय करावे याचे तपशीलवार दिग्दर्शन केले जाईल. या कार्यशाळेत प्रवेश घेण्यासाठी अभिनय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या कलावंतानी जीमेलवरील रंगपीठ थिएटर मुंबईच्या संकेतस्थळावर संपर्क साधण्याचे आवाहन रंगपीठ थिएटर मुंबईच्या गौरी केंद्रे व श्री छत्रपती शिवाजी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष  ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी केले आहे.

प्रा. वामन केंद्रे यांचे अभिनय व नाट्य प्रशिक्षण क्षेत्रातील योगदान अमूल्य व बेजोड आहे. त्यांच्याकडे शिकलेले आणि नावारूपाला आलेले शेकडो कलावंत आज नाटक, चित्रपट, मालिका, जाहिरात, वेबसिरीज, रेडिओ, नाट्य-चित्रपट शिक्षण इत्यादी माध्यमांत केवळ अग्रेसर आहेत. केंद्रे यांनी आजवर अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, चीन, जापान, सिंगापूर, मॉरीशस आदी देशांबरोबरच भारतभर ४०० हून अधिक कार्यशाळा घेऊन राष्ट्रीय आंतराष्ट्रीय दर्जाचे कलाकार घडवले आहेत.