नोटीस दिल्यानंतर व्यावसायिकांनी आग प्रतिबंधक उपकरणे बसविणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:07 AM2021-01-20T04:07:18+5:302021-01-20T04:07:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महापालिका आगीबाबत कुठल्याही प्रकारे दुर्लक्ष न करता फायर ऑडिट करून संबंधितांना वेळोवेळी नोटीस देते. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महापालिका आगीबाबत कुठल्याही प्रकारे दुर्लक्ष न करता फायर ऑडिट करून संबंधितांना वेळोवेळी नोटीस देते. नोटीस दिल्यानंतर संबंधित व्यावसायिकांनी आग प्रतिबंधक उपकरणे बसविणे गरजेचे आहे. आपला व्यवसाय ज्याठिकाणी आहे ती जागा, ती इमारत आग प्रतिरोधक असली पाहिजे, असे मत महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केले.
खैरानी रोड, साकीनाका येथे मंगळवारी सकाळी लागलेल्या आगीच्या घटनेप्रकरणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळाला भेट दिली. यावेळी त्या बोलत होत्या. त्यांनी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून आगीच्या घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली. या आगीच्या घटनेवरून असे लक्षात येते की, दाटीवाटीच्या जागेमध्ये व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी या ठिकाणी राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. प्रत्येक व्यावसायिकाने ही माझी जबाबदारी आहे असे समजून वागले तरच अशा प्रकारच्या घटनांमध्ये नागरिकांचे नाहक जाणारे बळी वाचू शकतील, असे महापौर म्हणाल्या.