मुंबई : के.जे.सोमय्या विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना प्राध्यापकाकडून अमानुष वागणूक आणि मारहाणीचा प्रकार नुकताच समोर आला आहे. डहाणू येथे शिबिरासाठी गेले असता एका प्राध्यापकाने या विद्यार्थ्यांना अर्धनग्न करून मारहाण केली. इतकेच नाही तर अर्धनग्न अवस्थेत त्यांना कडाक्याच्या थंडीत दोन तास उभे ठेवण्यात आले. दरम्यान महाविद्यालयाच्या जनसंपर्क विभागाकडून घटनेला दुजोरा देण्यात आला आहे.
शिबिरातून परत आल्यानंतर विद्यार्थ्यांनी झाल्या प्रकाराची तक्रार महाविद्यालयाकडे नोंदवूनही अद्याप प्राध्यापकांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या तक्रारी आता विद्यार्थी संघटनांकडे मांडल्या आहेत. मात्र भविष्यातील कारवाईच्या भीतीमुळे कोणीही विद्यार्थी लेखी तक्रार देण्यास तयार नसल्याचे संघटनांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय युथ काँग्रेसचे निखिल कांबळे यांनी मुख्यमंत्री, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच गृहमंत्री यांना पत्रे लिहून हे प्रकरण पॉक्सो अंतर्गत येत असल्याने याची गंभीर दखल घ्यावी आणि स्थानिक पोलिसांना तक्रार दाखल करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी केली आहे. शिवाय याप्रकरणी विशेष समितीची नेमणूक करून चौकशीचे आदेश द्यावेत, अशीही मागणी केली आहे. तसेच महाविद्यालयीन प्रशासनाकडून प्राध्यापकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जात असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अमोल मातेले यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आणि प्र-कुलगुरू याना केली आहे.
नियमानुसार कारवाई
विद्यार्थ्यांसोबत घडलेल्या प्रकरणासंदर्भात महाविद्यालयीन प्रशासनाने जनसंपर्क विभागामार्फत घटनेला दुजोरा दिला आहे. दरम्यान नियम आणि अटीप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही केली जाणार असल्याचे महाविद्यालयीन प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.