आयआयटी मुंबई मेसमध्ये नफेखोरी, शुल्कात पुन्हा वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2023 12:49 PM2023-04-05T12:49:47+5:302023-04-05T12:50:43+5:30
विद्यार्थ्यांकडून चौकशीची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: आयआयटी मुंबईच्या हॉस्टेल १२, १३ आणि १४ मधील मेससाठी नोंदणी करून पैसे देत असलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ४५ टक्क्यांपेक्षाही कमी विद्यार्थी तेथे जेवण करीत असल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांना एक हजार २४० इतके मेसचे पैसे भरण्यासाठी जबरदस्ती केली जात असून, आयआयटी मुंबई प्रशासनाने तात्काळ मेसचे शुल्क कमी करावे, अशी मागणी आयआयटी विद्यार्थ्यांनी केली आहे.
आयआयटीमधील सर्व हॉस्टेलचे पुन्हा टेंडर काढत मेसचे शुल्क पुनर्निर्धारित करण्याची मागणी जोर धरत आहे. नफेखोरीविरोधात विद्यार्थ्यांनी आवाज उठविला आहे. मागील वर्षात ऑगस्ट २०२२ मध्ये आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांकडून शिकवणी, वसतिगृह आणि मेस (खानावळ) यांच्या शुल्क कपातीसाठी साखळी उपोषण करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या उपोषणाला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांनी उपोषण मागे घेतले होते. मात्र त्यानंतर पुढील ५ ते ६ महिन्यांतच एकूण विद्यार्थ्यांपैकी केवळ ४० ते ४५ टक्के विद्यार्थीच हॉस्टेलच्या मेसमध्ये जेवत असल्याची माहिती समोर आली आहे. हॉस्टेल १२, १३ आणि १४च्या विद्यार्थ्यांची मेस संदर्भातील माहिती आंबेडकर फुले पेरियार स्टडी सर्कलने (एपीपीएससी) गोळा केली आहे.
हॉस्टेल १२, १३ आणि १४ मधील केवळ ३३ टक्के विद्यार्थी सकाळचा नास्ता, ४३ टक्के विद्यार्थी दुपारचे जेवण, ३१ टक्के विद्यार्थी रात्रीचे जेवण तर ४५ टक्के विद्यार्थी दूध घेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे इतर विद्यार्थी पैसे भरूनही मेसमध्ये जेवत नसल्याने प्रशासन आणि मेसचे केटरर्स केवळ नफा कमवीत असल्याची टीका विद्यार्थ्यांनी केली आहे.
एका विद्यार्थ्यांचे मेसचे एका महिन्याचे शुल्क एक हजार २४० असून, सामान्य विद्यार्थ्यांना ते न परवडणारे आहे. आयआयटीमधील सर्व हॉस्टेलच्या मेसच्या टेंडर्सची छाननी करण्याची मागणी एपीपीएससीकडून करण्यात आली आहे.