मुंबई : दहावीच्या निरोप समारंभाच्या नावाखाली इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांना ९०० रुपये प्रत्येकी भुर्दंड शाळेने केला आहे. १० वर्षे शिक्षकांनी शिकविले म्हणून त्या शिक्षकांना गिफ्ट द्यावे लागेल़ त्यासाठी प्रत्येकी ५०० रुपये असे दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला द्यायला पाहिजेत, असा फतवा शाळेने काढला आहे. बोरीवली पश्चिम येथील संत फ्रान्सिस आयसीएससी बोर्ड शाळेतील ही घटना आहे.
या शाळेचे ब्रदर जेव्हापासून शाळेत आले आहेत तेव्हापासून शाळेचे नाव फक्त पैसे लुटणारी शाळा असे झाले आहे. डोनेशन दिल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जात नाही. शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून दरवर्षी १५ ते २० टक्के फी वाढ चालू आहे. गरज नसताना दरवर्षी अभ्यासक्रम बदलला जातो; म्हणजे नवीन पुस्तके विकत घेताना ‘कमिशन’खोरी करता येते.
शासनाचा नियम मोडून एकाच दुकानातून पुस्तके, ड्रेस खरेदी करायला सांगितले जाते. फी वाढविताना कोणालाही विचारात घेतले जात नाही. अग्निशमन सुरक्षेसंबंधी एक माहिती देणारा कार्यक्रम हल्ली घेतला त्याचेही प्रत्येकी १०० रुपये शाळेने घेतले. शाळेचे व्यवस्थापन अतिशय गर्विष्ठ असून पालकांचा सतत अपमान केला जातो. आपल्या मुलांना त्रास होऊ नये म्हणून पालक गप्प बसतात, असे एका पीटीए मेंबरने नाव न देण्याच्या अटीवर सांगितले.
विद्यार्थ्यांच्या पैशाने बिल्डिंग आणि लिफ्ट बनविली. मात्र विद्यार्थ्यांना लिफ्ट वापरू देत नाहीत. लहान लहान मुले, वजनदार दप्तर उचलून ४ माळे चढतात. त्यांचे खांदे वाकडे झाले, फिजियो थेरेपी चालू आहे. पण शाळा ऐकत नाही. शिक्षक, ब्रदर हे फक्त लिफ्ट वापरतात, असे एका पालकाने सांगितले. गुजराती पालक प्रचंड नाराज आहेत. त्यांचादेखील या ‘पैसे’मागणीला विरोध आहे. आमच्या पाल्याचे पैसे तसेच नॉनव्हेज खाण्यासाठी दिले जाणार आहे म्हणूनदेखील ते नाराज आहेत़ या प्रकरणी पश्चिम उपनगर शिक्षण अधिकारी अनिल साबळे यांच्याशी संपर्क साधला असता, आपल्याकडे पालकांची या शाळेविरुद्ध अजून लेखी तक्रार आली नाही. मात्र आपण या प्रकरणी माहिती घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या शाळेच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क झाला नाही.शिक्षकांसाठी जेवणनववीच्या विद्याथ्यांकडून १ लाख ८ हजार रुपये जमा होतात. हे पैसे जेवणासाठी वापरणार आहेत. तर १० वीच्या विद्यार्थ्यांना ५०० रुपये भुर्दंड करून जवळजवळ ६० हजार रुपये जमा करून त्यातून शिक्षकांना भेटवस्तू आणल्या जाणार आहेत.