Join us  

सत्ताधारी शिवसेना नगरसेवकांची प्रगती खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 4:09 AM

मुंबई - महापालिकेत विरोधी बाकावर असलेला काँग्रेस पक्ष एका बिगर शासकीय संस्थेच्या सर्वेक्षणात अव्वल ठरला आहे. त्याचवेळी सत्ताधारी शिवसेना ...

मुंबई - महापालिकेत विरोधी बाकावर असलेला काँग्रेस पक्ष एका बिगर शासकीय संस्थेच्या सर्वेक्षणात अव्वल ठरला आहे. त्याचवेळी सत्ताधारी शिवसेना पक्षाच्या नगरसेवकांची कामगिरी मात्र खालावली असल्याचे यातून समोर आले आहे. या संस्थेमार्फत तयार करण्यात नगरसेवकांच्या प्रगतिपुस्तकात उत्तम कामगिरी करणाऱ्या दहा नगरसेवकांमध्ये शिवसेनेचे फक्त तीन नगरसेवक आहेत.

प्रजा फाऊंडेशन या संस्थेमार्फत दरवर्षी नगरसेवकांच्या कामगिरीचे मूल्यमापन करून प्रगतिपुस्तक तयार केले जाते. गेल्या वर्षीपासून मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू आहे. यंदा वार्षिक प्रगतिपुस्तक तयार करण्यात आलेले नाही. २०१७ ते २०२१ या पाच वर्षांच्या नगरसेवकांच्या कामगिरीचा आढावा घेऊन अहवाल तयार करण्यात आला आहे. सर्वात मोठा पक्ष असूनही शिवसेनेचे केवळ तीन नगरसेवक उत्तम कामगिरी केलेल्या नगरसेवकांच्या यादीत आहेत.

पहिले दहा नगरसेवक

उत्तम कामगिरी केलेल्या पहिला दहा नगरसेवकांच्या यादीमध्ये शिवसेनेचे समाधान सरवणकर, सुजाता पाटेकर व सचिन पडवळ यांचा समावेश आहे. भाजपचे हरीश छेडा, स्वप्ना म्हात्रे, सेजल देसाई आणि प्रीती सातम यांचाही नावे आहेत. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे. वीरेंद्र चौधरी आणि मोहसीन हैदर यांचाही पहिल्या दहामध्ये समावेश आहे.

भाजप शेवटीच

राजकीय पक्षांनी महापालिकेत केलेल्या उत्तम कामगिरीत काँग्रेस पक्षाने पहिला क्रमांक मिळवला आहे. शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर समाजवादी पक्षाला तिसरा क्रमांक देण्यात आला आहे. मात्र महापालिकेतील दुसरा मोठा पक्ष असल्याने विरोधी पक्ष नेते पदावर दावा करणाऱ्या व आक्रमक भूमिकेत असलेल्या भाजपला पहिल्या तीन पक्षांमध्ये स्थान मिळवता आलेले नाही.