जमीर काझी मुंबई : करड्या शिस्तीखाली वावरत असलेल्या महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील अधिकारी, अंमलदारांना आता आणखी एक दंडुका लावण्यात आलेला आहे. स्वत:वरील अन्याय किंवा व्यक्तिगत गाºहाणी जाहीरपणे मांडण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे. कोणत्याही प्रसारमाध्यमापुढे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्याबाबतची माहिती देता येणार नाही, अन्यथा त्यांना कारवाईच्या बडग्याला सामोरे जावे लागणार आहे.
पोलीस दलातील अधिकारी-अंमलदार यांच्यातील हेवेदावे, वाद प्रसारमाध्यमाद्वारे चव्हाट्यावर येत आहेत. त्यामुळे खात्याची बेअब्रू होत आहे. त्यामुळे यापुढे पोलिसांना इतरांच्या तक्रारीबरोबरच पोलीस महासंचालक सुबोध जायस्वाल यांनी वैयक्तिक गाºहाणी जाहीर करण्यास मनाई केली आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ३ वा ०९(३)(ड) या नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.
पोलीस दलात अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये वाद अथवा अन्याय होत असल्यास त्याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करून त्यांना कळविण्याची जबाबदारी संबंधित तक्रारदार पोलिसांवर आहे. मात्र त्याबाबत अनेक जण वरिष्ठांकडे अर्ज न देता परस्पर प्रसार माध्यामांना माहिती देतात, अनेकदा त्यांच्या तक्रारीत काहीही तथ्य नसते. जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी अशा तक्रारी दिल्या जातात. मात्र त्यास प्रसार माध्यमातून प्रसिद्धी मिळत असल्याने खात्याची बदनामी होत असते. अशा प्रकरणात तक्रार निष्पन्न न झाल्यास संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची तरतूद आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अशाच प्रकरणातून एका अधिकाºयाची बदनामी झाल्याने त्याने त्याबाबत राज्यस्तरीय पोलीस कर्मचारी वृंद परिषदेत मुद्दा उपस्थित केला होता. त्या वेळी महासंचालक जायस्वाल यांनी यापुढे पोलिसांनी वैयक्तिक तक्रार, अन्यायाबाबतही प्रसारमाध्यमांकडे न जाता वरिष्ठांकडे दाद मागितली पाहिजे. पोलिसांनी वृत्तपत्र, आकाशवाणी अथवा अन्य माध्यमांद्वारे जाहीर भाषण किंवा सार्वजनिक ठिकाणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या माहिती देता कामा नये, असे निर्देश दिले आहेत. त्यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा नियमावलीतील उपरोक्त नियमाचा आधार घेण्यात आला आहे. सर्व पोलीस घटकप्रमुखांना या नियमावलीतील तरतुदीनुसार योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे यापुढे पोलिसांना आपल्यावरील अन्यायासाठी वरिष्ठांकडेच गाºहाणे मांडावे लागणार आहे.तोंड दाबून बुक्क्याचा मारपोलिसांना आपल्यावरील अन्याय केवळ वरिष्ठांकडेच मांडण्याची सूचना महासंचालकांनी दिली आहे, मात्र बहुतांश वेळा अधिकाऱ्यांकडून संबंधित तक्रारीवर योग्य कार्यवाही केली जात नाही, पक्षपातीपणा करून तक्रारदारावर अन्याय केला जातो. त्यामुळे नाइलाजास्तव प्रसारमाध्यमाकडे धाव घेतली जाते. मात्र आता त्यावर निर्बंध घातल्याने पोलिसांना आता ‘तोंड दाबून बुक्क्याचा मार’ सहन करण्याची वेळ आली आहे. त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा घालण्यात आल्याची चर्चा पोलीस वर्तुळात होत आहे.