सरकारचा कार रॅलीद्वारे निषेध
By admin | Published: April 24, 2015 10:54 PM2015-04-24T22:54:44+5:302015-04-24T22:54:44+5:30
केडीएमसीत समावेश न करता २७ गावांसाठी स्वतंत्र नगरपालिकाच स्थापन करावी, या मागणीसाठी सर्वपक्षीय हकक संरक्षण संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवारी भव्य कार रॅली काढण्यात आली.
कल्याण : केडीएमसीत समावेश न करता २७ गावांसाठी स्वतंत्र नगरपालिकाच स्थापन करावी, या मागणीसाठी सर्वपक्षीय हकक संरक्षण संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवारी भव्य कार रॅली काढण्यात आली. स्वतंत्र नगरपालिकेची मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा या वेळी देण्यात आला.
वगळलेल्या २७ गावांचा पुन्हा केडीएमसीत समावेश करावा, अशी अधिसूचना शासनाने जारी केली आहे. परंतु, सर्वपक्षीय संघर्ष समितीने गावे पुन्हा महापालिकेत समावेश करण्यास विरोध दर्शविला आहे. गावांनी महापालिकेतून मुक्त होण्यासाठी १९ वर्षे लढा दिला. महापालिकेत गावे असताना सोयीसुविधांअभावी मोठ्या अडचणींना स्थानिकांना सामोरे जावे लागले. केडीएमसीत २७ गावांचा विकास करण्याची क्षमता नसून सुरुवातीपासून महापालिकेत समाविष्ट असलेली बल्याणी, आंबिवली, मोहिली ही गावेदेखील सुविधांपासून वंचित राहिल्याचा आरोप संघर्ष समितीने केला आहे.
शासनाने अधिसूचना जारी करताना स्थानिकांना विश्वासात घेतलेले नाही. केडीएमसीत समावेश होण्यासंदर्भात स्थानिकांनी मोठ्या प्रमाणावर हरकती नोंदविल्या असून याचा विचार शासनाने करायला हवा, याकडे समितीने लक्ष वेधले आहे. याआधी बैठका, सभा घेऊन निषेध नोंदविला गेला असताना शुक्रवारी समितीने कार रॅलीच्या माध्यमातून आपली विरोधाची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. मानपाडेश्वर मंदिरापासून काढण्यात आलेली रॅली कल्याण-शीळमार्गे कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाच्या आवारात पोहोचली. तेथे कल्याणचे तहसीलदार किरण सुरवसे यांना शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनापर्यंत समितीची भूमिका पोहोचविली जाईल, असे आश्वासन सुरवसे यांनी दिले. कार रॅलीत ७० ते ८० वाहने सहभागी झाली होती.
समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार यांच्या नेतृत्वाखाली काढल्या गेलेल्या या रॅलीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वंडार पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी आमदार रमेश पाटील, समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते.