लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय अर्थात, राणीबागेतील प्रवेशाच्या तिकीट दरवाढीवरून राजकीय आखाडा सुरूच आहे. राणीबागेतील तिकीट दरवाढ कमी केल्यानंतरही, प्रभात फेरीसाठी आकारण्यात येणाऱ्या मासिक शुल्कवाढीवरून भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नगरसेविका सुरेखा लोखंडे यांनी परिसरात निषेध फलक झळकावले आहेत.या आधी तिकीट दरवाढीविरोधात भाजपाने परिसरात निषेधाचे फलक झळकावले आहेत. त्यानंतर, झालेला विरोध पाहून प्रशासनाने प्रस्तावित तिकीट दरवाढ काही अंशी कमी केली. मात्र, मासिक शुल्कातील वाढ ‘जैसे थे’ ठेवली. या संदर्भात लोखंडे म्हणाल्या की, ‘राणीबाग हे गिरणगाव परिसरात असून, परिसरात आजही गिरणी कामगार आणि त्यांचे वारस हजारोंच्या संख्येने वास्तव्य करत आहेत. बहुतेक नागरिकांना शुद्ध हवा, वजन कमी करणे अशा विविध कारणास्तव सकाळी फिरायला राणीबागेत यावे लागते. वृद्धापकाळामुळे कुटुंबातील एका व्यक्तीला सोबत म्हणून यावे लागत असल्याची अनेक उदाहरणे या ठिकाणी दिसतात. अशा परिस्थितीत मासिक शुल्कात पाचपट वाढ करणे, अन्यायकारक ठरते. त्यामुळे सर्वसामान्यांना परवडेल, अशी दरवाढ करण्याची मागणी महापालिकेकडे केली आहे.’महापालिकेला महसूल मिळावा आणि उद्यानाच्या देखरेखीसाठी शुल्कवाढ आवश्यक आहे. मात्र, त्यासाठी ३० रुपयांऐवजी थेट १५० रुपये आकारून पर्यटकांसह गरजू नागरिकांच्या खिशाला कात्री का म्हणून लावायची? असा सवाल लोखंडे यांनी उपस्थित केला आहे. ३० रुपयांमध्ये दरवाढ करून त्या ठिकाणी कमाल ५० रुपये आकारण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. महासभेत मासिक शुल्कवाढीचा प्रस्ताव मान्य झाल्यास, राणीबागेसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला आहे.
राणीबाग मासिक शुल्कावरून निषेध फलक
By admin | Published: May 29, 2017 4:57 AM