पेट्रोल दरवाढीचा मुंबईकरांकडून निषेध
By admin | Published: April 24, 2017 02:46 AM2017-04-24T02:46:27+5:302017-04-24T02:46:27+5:30
पेट्रोलच्या किंमतीत ३ रुपयांनी वाढ केल्यामुळे त्याचा सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे. गेल्या दीड ते दोन वर्षांत पेट्रोलच्या
मुंबई: पेट्रोलच्या किंमतीत ३ रुपयांनी वाढ केल्यामुळे त्याचा सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे. गेल्या दीड ते दोन वर्षांत पेट्रोलच्या किंमतींमध्ये ७ ते ८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती घसरत असताना देशात विशेषत: मुंबईतील पेट्रोलच्या किंमतीत वाढ होत असल्याने मुंबईकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सध्या मुंबईतील पेट्रोलचे दर हे देशात सर्वाधिक दर आकारणाऱ्या शहरांत दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्य सरकारने लादलेल्या अधिभारामुळे मुंबईकरांनी प्रती लीटर पेट्रोलसाठी ७७ रुपये ४५ पैसे खर्च करावे लागत आहेत. सर्वाेच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयामुळे महामार्गापासून ५०० मीटर अंतरावरील दारूची दुकाने बंद झाली आहेत. परिणामी, महामार्गानजीकच्या दारूच्या दुकानांमधून मिळणारा महसूलही कमी झाला आहे. ही महसुली तूट भरून काढण्यासाठी सरकारने पेट्रोलच्या किंमतीत ३ रुपयांनी वाढ करण्याचा पर्याय शोधला असून तो चुकीचा असल्याचे मत सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.
दारूच्या दुकानांमधून वसूल होणारा महसूल इतर दारूंच्या दुकानांवर अधिभार लादून वसूल केला जावा, असे व विविध पर्यायही मुंबईकरांमधून सुचविले जात आहेत. मुंबई पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष रवी शिंदे यांनी दरवाढीचा निषेध केला आहे. सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तोटा भरून काढण्यासाठी सरकारने असा निर्णय घेणे चुकीचे आहे. यामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत ५० डॉलरपेक्षा कमी असताना मुंबईतील पेट्रोलची किंमत वाढतेच आहे. नेहमीच पेट्रोलच्या किंमती वाढवणे योग्य नसल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)