मुंबई : नेत्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे अभीष्टचिंतन अशा प्रकारच्या होर्डिंग्जवर बंदी आणण्याच्या निर्णयावर महापालिका प्रशासन ठाम आहे. त्यामुळे राजकीय बॅनरबाजीवर निर्बंध आणणारे नवीन धोरण स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी मांडण्यात आले आहे. मात्र या धोरणामुळे राजकीय पक्षांच्या जाहिरातबाजीला लगाम लागणार असल्याने नगरसेवकांमध्ये नाराजी आहे.
मोक्याच्या ठिकाणी झळकणाºया होर्डिंग्जने मुंबईचा चेहरा विद्रूप केला आहे. याची गंभीर दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयानेच महापालिकेला फटकारले तर राजकीय पक्षांचीही कानउघाडणी केली. तरीही मुंबईत असे होर्डिंग्ज झळकतच आहेत. त्यामुळे यावर अंकुश आणण्यासाठी महापालिकेने नवीन धोरण आणले. यामध्ये राजकीय आणि व्यावसायिक संस्थांच्या जाहिरात फलकांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली. यामुळे राजकीय पक्षांची मात्र मोठी गोची झाल्याने या धोरणावर फेरविचार करण्याची मागणी नगरसेवकांकडून होत आहे. हा प्रस्ताव विधि समितीच्या बैठकीत मंजूर झाल्यानंतर प्रशासनाने स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी मांडला आहे.
परंतु, नगरसेवकांनी केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सूचना फलक लावण्याची परवानगी त्यांना मिळणार आहे. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच होर्डिंग्जबाबत धोरण तयार करण्यात आले आहे. या धोरणाचा मसुदा तयार करून नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यामुळे आपल्या निर्णयावर ठाम राहत या धोरणातील अन्य तरतुदींमध्ये मोठा बदल महापालिका प्रशासनाने केलेला नाही. मात्र अनेकवेळा राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते अनधिकृत होर्डिंग लावत असल्याने हे धोरण त्यांच्यावर अंकुश कसे आणणार, असा सवाल उपस्थित होत आहे.असे असेल नवे धोरणराजकीय तसेच कोणाकडूनही वाढदिवसाचे अभीष्टचिंतन, पदाधिकाºयांचे नियुक्तीचे अभिनंदन, धार्मिक सणानिमित्त शुभेच्छा आदी जाहिरात प्रदर्शित करण्यास पूर्णपणे बंदी. तसेच व्यावसायिक संस्थेच्या जाहिरात फलकांवरही पूर्णपणे बंदी.राजकीय पक्षांचे कार्यक्रम, मेळावे, अधिवेशन या काळात केवळ कार्यक्रमाच्या ठिकाणी गुणवत्ता व जागेच्या उपलब्धतेनुसार व्यावसायिक दराप्रमाणे कमाल १० बाय १० फूट आकारमानाच्या दोन फलकांना कार्यक्रमाच्या कालावधीत व कार्यक्रमाच्या एक दिवस आधी व नंतर एक दिवस जाहिरात फलक लावण्यास परवानगी.धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी झालेल्या धार्मिक व सामाजिक संस्था यांना फक्त कार्यक्रमाच्या ठिकाणी व्यावसायिक दराप्रमाणे कमाल १० बाय १० फूट आकारमानाच्या दोन फलकांना कार्यक्रमाच्या कालावधीत व कार्यक्रमाच्या एक दिवस आधी व नंतर एक दिवस जाहिरात फलक लावण्यास परवानगी.परवानगी देताना प्रचलित व्यावसायिक दरसूचीनुसार एक महिन्याच्या जाहिरात शुल्काएवढ्या रकमेच्या तीनपट रक्कम अनामत म्हणून परवानगी अर्जासोबत भरावे लागेल.गणेशोत्सव व नवरात्रौत्सव काळात फक्त मंडपात आणि मंडपापासून १०० मीटरपर्यंत व्यावसायिक जाहिरात फलकांना परवानगी. मात्र कोणतीही व्यक्ती, राजकीय कार्यकर्ता किंवा राजकीय पक्षांच्या शुभेच्छा, स्वागत आदी बॅनर व बोर्ड मंडपाच्या बाहेर लावण्यास प्रतिबंध असणार आहेत.