Join us

सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करण्यास मनाई; राज्य सरकारकडून बकरी ईदसाठी गाईडलाईन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 7:07 PM

बकरी ईदच्या दिवशी कंटेन्मेंट झोनमध्ये कोणतीही शिथीलता देण्यात येणार नाही.

मुंबई: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी करावी, असं आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे. राज्य सरकारकडून बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या सूचनांचे पालन करावे, असंदेखील आवाहन अनिल देशमुख यांनी केलं आहे.

बकरी ईदच्या दिवशी कंटेन्मेंट झोनमध्ये कोणतीही शिथीलता देण्यात येणार नाही. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करण्यास मनाई करण्यात आल्याचं राज्य सरकारने आज स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काही लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी यांची एक बैठक पार पडली होती. या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी बकरी ईद साधेपणाने साजरी करावी, असे सर्वानुमते ठरले. तसेच बकरी ईदच्या निमित्त शासनाने सहा मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत.

बकरी ईदसाठी सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना पुढील प्रमाणे आहे-

१. कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यास अनुसरुन बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी.

२. सध्या कार्यान्वीत असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पध्दतीने अथवा दूरध्वनीवरुन जनावरे खरेदी करावी.

३. नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी.

४. प्रतिबंधित (Containment) क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले निबंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही.

५. बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये. 

६. कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील.

दरम्यान, 'सण आणि उत्सव हे जीवनाचा आनंद वाढविण्यासाठी असतात. आज एकीकडे कोरोनाची साथ झपाट्याने वाढते आहे, ती रोखण्याचे आटोकाट प्रयत्न आपण करीत आहोत. गेल्या ४ महिन्यांत आपण सर्व धर्मियांचे सण मर्यादित प्रमाणात साजरे केले. त्याचप्रमाणे येणारी बकरी ईद देखील साधेपणाने, जमल्यास प्रतिकात्मकरित्या आणि नियमांचे पालन करून साजरी व्हावी', अशी उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच व्यक्त केली आहे.

टॅग्स :बकरी ईदमहाराष्ट्र सरकारअनिल देशमुखमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस