प्रज्ञासिंहच्या शहीद करकरेंवरील वक्तव्याचा पोलीस वर्तुळातून निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 05:17 AM2019-04-20T05:17:28+5:302019-04-20T05:17:39+5:30
भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिने शहीद आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबाबत केलेल्या विधानाचा पोलीस वर्तुळासह सर्व स्तरांतून तीव्र निषेध व्यक्त होत आहे.
मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी व भोपाळ लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिने शहीद आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबाबत केलेल्या विधानाचा पोलीस वर्तुळासह सर्व स्तरांतून तीव्र निषेध व्यक्त होत आहे. मुंबईकरांच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती दिलेल्या हुतात्म्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या प्रज्ञासिंह हिची निवडणूक आयोगाने उमेदवारी रद्द करून कडक कारवाई करावी, अशी मागणी आयपीएस असोसिएशनने केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर त्यांची भूमिका जाहीर करण्याचीही मागणी होत आहे. राष्टÑवादावर मत मागणाºया सत्ताधारी भाजपला थोडी जरी लाज असल्यास त्यांनी त्वरित साध्वीवर कारवाई करावी, यासह असंख्य निषेधात्मक प्रतिक्रियांचा पाऊस सोशल मीडियावर शुक्रवारी सकाळपासून पडत आहे.
मालेगाव बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी प्रज्ञासिंह सध्या जामिनावर आहे. भाजपने तिला भोपाळ मतदारसंघातून काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांच्याविरोधात उमेदवारी दिली आहे. मतदारसंघात प्रचार करीत असताना तिने २६/११ हल्ल्यातील शहीद करकरे यांच्याबाबत अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. करकरे यांचा मी दिलेल्या शापामुळे सर्वनाश झाला असून ते देशद्रोही होते, असे तिने सांगितले. त्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावरून व्हायरल झाली असून सर्व स्तरांतून त्यावर टीकेची झोड उठली आहे.
आयपीएस असोसिएशनने याबाबत टिष्ट्वट करून म्हटले आहे की, अशोकचक्राने सन्मानित हेमंत करकरे यांनी अतिरेक्यांशी लढताना आपल्या प्राणाची बाजी लावली होती. एका उमेदवाराकडून वर्दीवाल्यांचा असा अपमान करणे निंदनीय आहे. सर्व शहिदांच्या बलिदानाचा उचित मान ठेवलाच पाहिजे, अशी मागणी आम्ही करीत आहोत.
अनेक निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी प्रज्ञासिंहच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. शहीद करकरे यांच्यावर ‘हु किल्ड करकरे’ हे पुस्तक लिहिलेले निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक एस. एम. मुश्रीफ म्हणाले, साध्वीचे विधान अत्यंत निषेधार्ह आहे. शहीद करकरे हे तिच्या शापामुळे गेले नाहीत तर त्यांना कट करून मारण्यात आले होते. त्यामध्ये उजव्या विचारसरणीच्या मंडळींसह काही अधिकाºयांचा सहभाग होता. माझ्या पुस्तकात ही बाब मी उघड केली आहे.
निवृत्त उपअधीक्षक अमरसिंग गौर म्हणाले, देशासाठी प्राणाची आहुती दिलेल्या शहिदाचा असा अपमान करणाºया साध्वीची उमेदवारी रद्द केली पाहिजे, तसेच तिच्यावर स्वतंत्रपणे गुन्हा दाखल करून कारवाई केली पाहिजे. साहाय्यक फौजदार सुनील टोके म्हणाले, अपमानास्पद वक्तव्याबाबत सरकारने साध्वीवर तातडीने कारवाई न केल्यास त्याविरुद्ध आपण उच्च न्यायालयात याचिका दाखल करू.
>निवृत्त अतिवरिष्ठ अधिकाºयांचे मौन
साध्वीच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत वरिष्ठ अधिकाºयांमध्ये तीव्र संताप असला तरी खात्यात कार्यरत असल्यामुळे त्यांनी उघडपणे भाष्य करणे टाळले आहे. शिस्तभंगाची कारवाई होण्याची भीती त्यांनी बोलून दाखविली. मात्र पोलीस दलात सर्वोच्च पदावरून निवृत्त झाल्यानंतर अन्य ठिकाणी नियुक्त झालेल्या अधिकाºयांनीही त्याबाबत बोलण्यास असर्मथता दर्शविली आहे.