प्रकल्पग्रस्तांमध्ये दि. बां.चा करिष्मा कायम
By Admin | Published: June 11, 2015 05:47 AM2015-06-11T05:47:52+5:302015-06-11T05:47:52+5:30
हुतात्म्यांचे रक्त वाया जात नसते व जाऊही द्यायचे नसते हा विचार प्रकल्पग्रस्तांमध्ये रुजविणाऱ्या दि. बा. पाटील यांचा करिष्मा आजही कायम आहे.
नामदेव मोरे, नवी मुंबई
हुतात्म्यांचे रक्त वाया जात नसते व जाऊही द्यायचे नसते हा विचार प्रकल्पग्रस्तांमध्ये रुजविणाऱ्या दि. बा. पाटील यांचा करिष्मा आजही कायम आहे. भूमिपुत्रांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी होणाऱ्या आंदोलनांचे नियोजन व बैठका आजही त्यांच्या ‘संग्राम’ या निवासस्थानीच घेतल्या जात आहेत. त्यांच्या आठवणी व आयुष्यभर केलेला संघर्ष लढण्याचे बळ देत आहे.
पनवेल, उरण व नवी मुंबई ही संघर्षाची भूमी म्हणून ओळखली जाते. येथील भूमिपुत्रांनी सिडको व शासनविरोधात अनेक लढे उभारले व यशस्वी केले. सिडकोची स्थापना झाल्यापासून सुरू झालेल्या संघर्षामध्ये लोकनेते दि. बा. पाटील यांचे मोठे योगदान आहे. पूर्ण आयुष्य प्रकल्पग्रस्तांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी खर्ची घातले. जासईला १९८४ मध्ये उभारलेल्या लढ्यामध्ये पाच जण हुतात्मा झाले. दि. बां.सह अनेक जण जखमी झाले. या लढ्याचे पडसाद देशभर उमटले. अखेर शासनाला नमते घेऊन शेतकऱ्यांना साडेबारा टक्के जमीन परत देण्याचा निर्णय घ्यावा लागला. यानंतरही भूमिपुत्रांचे लढे सुरूच होते. कधी सिडको, जेएनपीटी तर कधी एमआयडीसी.
आंदोलनाचे ठिकाण वेगळे असले तरी नेतृत्व मात्र दि.बां.चेच राहिले. पनवेल, उरणमध्ये राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये टोकाचा संघर्ष असतो. परंतु जेव्हा विषय प्रकल्पग्रस्तांच्या हक्काचा असतो, तेव्हा मात्र सर्व नेते मतभेद बाजूला ठेवून एका व्यासपीठावर येतात. २४ जून २०१३ ला दि. बा. पाटील यांचे निधन झाले. परंतु त्यानंतरही सर्वपक्षीय नेते प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन असेल तर आजही ‘संग्राम’ या त्यांच्या निवासस्थानी एकत्र जमतात. लोकनेत्यांच्या खुर्चीला साक्षी ठेवून लढ्याची दिशा ठरविली जाते. जनहितासाठी संघर्ष करण्याच्या आणाभाका घेतल्या जातात.
पनवेल व उरणच्या तुलनेमध्ये नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांनी मोठी आंदोलने केली नाहीत. परंतु मंगळवारी सिडकोवर निघालेल्या मोर्चाने आतापर्यंतचा इतिहास बदलला. २८ गावांतील हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. या लढाऊ वृत्तीमागेही दि. बां.चीच प्रेरणा होती. या मोर्चाला ‘दि. बा. पाटील निर्धार मोर्चा’ असे नाव देण्यात आले.
प्रत्येक गावामध्ये त्यांच्या कर्तृत्वाचा जागर करण्यात आला. माजी खासदार रामशेठ ठाकूर, बाळाराम पाटील, श्याम म्हात्रे, महेंद्र घरत व इतरांनी संग्राममध्ये बैठक घेऊन या लढ्यास पाठिंबा जाहीर केला. सर्व नेते आंदोलनामध्ये सहभागी झाले. पहिल्यांदा नवी मुंबई, पनवेल व उरणमधील नेते एकाच व्यासपीठावर आले, याचे श्रेयही दि. बा. पाटील यांच्या प्रेरणादायी विचारांनाच दिले जात आहे.