- स्रेहा मोरेमुंबई : जागतिक महिला दिनानिमित्त राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मुंबईतील दहा रेल्वे स्थानकांवर स्वयंचलित रक्तदाब यंत्र बसविण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकल्पाच्या माध्यमातून घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांना रेल्वे स्थानकांवरच रक्तदाब तपासण्याची सेवा उपलब्ध होणार होती. मात्र घोषणेला दीड महिना उलटूनही स्थानकांवर यंत्र बसविले नसून याविषयी आरोग्य विभागाला विचारले असता हा प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच रद्द केल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.जागतिक महिला दिनी पार पडलेल्या कार्यक्रमात आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाची घोषणा केली. एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते की, राष्ट्रीय असंसर्गजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी स्थानकांवर स्वयंचलित रक्तदाब तपासणी यंत्रे बसविण्यात येतील. दैनंदिन व्यस्त जीवनात रक्तदाबासंदर्भात वेळीच तपासणी करणे शक्य होऊन त्यावर उपचार करणे सुलभ व्हावे यासाठी ही यंत्रे मुंबईतील दहा रेल्वे स्थानकांवर प्राथमिक टप्प्यात बसविण्यात येणार होती. यंत्र चालविण्यासाठी तंत्रज्ञ, परिचारिकांची गरज नाही. रक्तदाब तपासणीसाठी व्यक्तीने यंत्रामध्ये हात ठेवताच त्याचा रक्तदाब मोजला जातो आणि त्याची माहिती प्रिंटद्वारे त्या व्यक्तीला समजते. त्यामुळे व्यस्त दिनक्रमातही रक्तदाबाविषयी माहिती मिळणार होती. मात्र, दीड महिना उलटूनही कोणत्याही रेल्वे स्थानकावर हे यंत्र बसविण्यात आलेले नाही.‘अचूकतेच्या अभावाची भीती’राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक डॉ. अनूपकुमार यादव यांनी सांगितले की, या प्रकल्पाविषयीचा प्रस्ताव राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडे आला होता. मात्र स्थानकांवर रक्तदाब तपासणे हे धोक्याचे ठरू शकते. स्थानकांवर असणारे प्रवासी बºयाचदा धावपळीत असतात. अशावेळी रक्तदाब तपासण्यासाठी आवश्यक असणाºया शारीरिक आणि मानसिक स्थैर्यतेचा अभाव असण्याची अधिक शक्यता आहे. रक्तदाब तपासूनही तो अचूक येणार नाही, परिणामी नोंद झालेल्या रक्तदाबामुळे प्रवासी अधिक चिंताग्रस्त होऊ शकतात. एकंदरित, ही स्थिती लक्षात घेऊन आरोग्य विभागाने हा प्रकल्प रद्द केला आहे.
रेल्वे स्थानकांवरील स्वयंचलित रक्तदाब यंत्रांचा प्रकल्प रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 5:03 AM