Join us

हे प्रकल्प साकार होईनात...

By admin | Published: November 13, 2016 4:13 AM

निवडणुकीच्या मोसमात मतदारांना खूश करण्यासाठी राजकीय पक्ष अनेक घोषणा करीत असतात. मात्र परदेशी दौऱ्यातून प्रेरित होऊन आणलेल्या विदेशी संकल्पना मुंबईत साकार होण्यास

- शेफाली परब-पंडित,  मुंबई

निवडणुकीच्या मोसमात मतदारांना खूश करण्यासाठी राजकीय पक्ष अनेक घोषणा करीत असतात. मात्र परदेशी दौऱ्यातून प्रेरित होऊन आणलेल्या विदेशी संकल्पना मुंबईत साकार होण्यास अनंत अडचणी उभ्या राहतात. त्यामुळे गाजावाजा करीत जाहीर झालेले हे प्रकल्प प्रत्यक्षात खुशीची गाजरेच ठरत आहेत. राणीच्या बागेत पेंग्विनच्या मृत्यूनंतर भूमिगत थ्री डी मत्स्यालय बांधण्याचा मोह पालिकेने आवरला आहे. मात्र ऐनवेळी गुंडाळण्यात आलेला हा पहिला प्रकल्प नव्हे. विशेषत: सत्ताधारी शिवसेनेने मुंबईकरांना दाखविलेली अशी काही स्वप्ने भंगच झाली आहेत.दक्षिण कोरियातून आणलेल्या हेम्बोल्ट जातीच्या आठ पेंग्विनपैकी एकाचा मृत्यू झाला. या परदेशी पाहुण्यांना मुंबईत आणण्याचे शिवसेनेच्या युवराजांचे स्वप्न होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावरच पेंग्विनच्या मृत्यूने शिवसेना कात्रीत सापडली आहे. हे प्रकरण आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजत असून या प्राणिसंग्रहालयाची मान्यताही धोक्यात आली आहे. धूळमुक्त मुंबई२०११ मध्ये शिवसेनेने पालिका निवडणुकीतील वचननाम्यात मुंबई धूळमुक्त करण्याचा निर्धार केला होता़ तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांनी या प्रकल्पाची संकल्पना मांडली होती. मात्र गेल्या पाच वर्षांत त्या दिशेने एकही पाऊल शिवसेनेने टाकलेले नाही़ मित्रपक्ष भाजपानेच प्रकल्प अडकवून ठेवल्याने सेनेची कोंडी झाली.असे काही प्रकल्पशिववडा योजना : २००८ मध्ये झुणका-भाकर योजनेची जागा शिववडा योजनेने घेतली. त्यानुसार १२५ स्टॉल्सचे वाटप होणार होते. मात्र लाभार्थ्यांमध्ये शिवसैनिकच आघाडीवर होते. जागेच्या तुलनेत अर्जदारांची संख्या पाचपट असल्याने ही योजना वादात सापडली. बऱ्याच ठिकाणी शिववडाच्या नावाने बेकायदा स्टॉल्स सुरू झाले. २०१० मध्ये शिवसेनेने पुन्हा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पालिकेच्या दहा मंडयांमध्ये शिववडापाव सुरू करण्याचा निर्णय घेतला. मुंबईत अडीचशे ठिकाणी सुरू असलेल्या बेकायदा शिववडापावच्या गाड्यांवर कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आॅगस्ट २०१६ मध्ये दिले.मेणाचे संग्रहालय, मुंबई दर्शनतत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष व विद्यमान गृहनिर्माण, उच्च व तांत्रिक शिक्षणमंत्री रवींद्र वायकर यांनी मादाम तुसाँ वॅक्स म्युझियम आणि लंडन आयच्या धर्तीवर मुंबईत मेणाचे संग्रहालय आणि मुंबई दर्शन उभारण्याची संकल्पना २००८ मध्ये मांडली होती. त्यानुसार वांद्रे येथे १६० फुटांवर लंडन आयची प्रतिकृती आणि गिरगाव येथे मेणाचे संग्रहालय उभारण्याची घोषणा करण्यात आली. मात्र कालांतराने हे प्रकल्प बासनात गुंडाळण्यात आले.आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीम पार्कमहालक्ष्मी रेसकोर्सवरील भाडेकरार संपुष्टात आल्यामुळे त्यावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीम पार्क बांधण्याचा प्रस्ताव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकार दरबारी मांडला. मात्र मित्रपक्षच वैरी झाल्यामुळे भाजपा राज्यात सत्तेवर असूनही हा प्रस्ताव राज्य सरकारकडे धूळ खात पडला आहे. राणीबागेचे नूतनीकरणभायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय म्हणजेच राणीच्या बागेचे सिंगापूरस्थित झुरांग पार्कच्या धर्तीवर नूतनीकरण करण्यात येत आहे. मात्र अनंत अडचणी पार करीत २००७ पासून पुढे सरकणाऱ्या या प्रकल्पाच्या खर्चात आणि यामधील अनेक प्रकल्पांमध्येही कपात झाली आहे.थ्री डी मत्स्यालयदेशातील पहिले भूमिगत थ्रीडी मत्स्यालय बांधण्याचा निर्णय सेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेने घेतला. त्यानुसार जमिनीच्या आठ मीटर खाली २० मीटर काचेच्या भुयारात जगभरातील सुमारे ४५० मत्स्यजीव ठेवण्यात येणार होते. जगात अशा प्रकारचे पाच मत्स्यालय आहे. पेंग्विनसाठी निवारा बांधणाऱ्या मेसर्स हायवे कन्स्ट्रक्शन या कंपनीने या मत्स्यालयाचा आराखडा तयार केला होता. त्याला प्रशासकीय मंजुरीही मिळाली होती. मात्र पेंग्विन मृत्यूप्रकरण आणि या कंपनीचे कागदपत्रच बोगस असल्याचे चर्चेत असल्याने हा प्रकल्प गुंडाळण्याची शक्यता आहे.टेकस्टाईल म्युझियमगिरणगावाची आठवण ताजी करण्यासाठी टेक्स्टाईल म्युझियम उभारण्याचा प्रकल्प २००९ मध्ये जाहीर करण्यात आला. मात्र वर्षामागून वर्षे सरली तरी हे म्युझियम साकारण्याचे काही नाव नाही.चित्ता कॅफे : २००८ मध्ये राणीबागेच्या नूतनीकरणाच्या आराखड्यात चित्ता कॅफेचा समावेश होता. मात्र मूळ चारशे कोटींच्या या प्रकल्पाच्या खर्चात कपात होऊन दीडशे कोटीच प्रशासनाने मंजूर केल्यामुळे हा प्रकल्प रद्द करण्यात आला.फाइव्ह डी थिएटर : फाइव्ह डी थिएटरद्वारे प्राणी, पक्षी आणि समुद्री जिवांची माहिती करून देणारे फाइव्ह डी थिएटरचा प्रस्तावही रद्द करण्यात आला आहे.