Join us

मध्य रेल्वेवर राबविणार ‘प्रोजेक्ट मृत्युंजय’, अपघातांची संख्या कमी करण्यासाठी प्रवासी संघटनांचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 11:05 AM

Central Railway: उपनगरीय गाडी अर्थात लोकल ही मुंबईकरांची लाडकी. सकाळ-सायंकाळ या लाडक्या लोकलच्या कुशीत शिरून मुंबईकर निर्धास्त प्रवास करत असतात.

 मुंबई : उपनगरीय गाडी अर्थात लोकल ही मुंबईकरांची लाडकी. सकाळ-सायंकाळ या लाडक्या लोकलच्या कुशीत शिरून मुंबईकर निर्धास्त प्रवास करत असतात. मात्र, याच लोकलसमोर कोणी स्वखुशीने आपल्या प्राणांची आहुती देतो तर मार्गात चुकून आलेल्याला लोकल धडक देते. त्यामुळे लोकल प्रवासाला बट्टा लागतो. मात्र, अशा घटनांना रोखण्याचा दृढनिश्चय आता प्रवासी संघटनांनी केला आहे. त्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाशी हातमिळवणी केली जाणार आहे. ‘प्रोजेक्ट मृत्युंजय’ असे नाव या उपक्रमाला देण्यात आले आहे.  १६ एप्रिल रोजी रेल्वेला १७० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षित, सुखकर, आरोग्यदायी प्रवासासाठी, मुंबईतील सर्व प्रवासी संघटना, वाहतूक तज्ज्ञ यांची ‘मुंबई रेल्वे महाचर्चा’ शनिवारी दादर येथे आयोजित करण्यात आली होती. त्यात रेल्वे रुळांवर होत असलेल्या अपघातांना आळा घालण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, यावर ऊहापोह झाला.

दर महिन्याला ऑनलाइन बैठकमध्य रेल्वेवरील १ ते ४ रेल्वेमार्ग फक्त लोकलसाठी आरक्षित असावेत, तसेच अपंगांच्या डब्यात होणाऱ्या सामान्य प्रवाशांच्या घुसखोरीला आळा घालावा, अशी मागणी यावेळी पुढे आली. तसेच प्रत्येक स्थानकात स्वच्छता अभियान राबवण्यात येणार असून दर महिन्याला ऑनलाइन बैठक आयोजित केली जाईल, असे मुंबई रेल प्रवासी संघाचे सरचिटणीस सिद्धेश देसाई यांनी सांगितले.

रेल्वे ट्रॅकवरील अपघात दिवसेंदिवस वाढत आहेत. हे अपघात कमी कसे करता येतील याबाबत उपाययोजना करण्यासाठी सर्वजण एकत्रित काम करणार असून त्यासाठी ‘प्रोजेक्ट मृत्युंजय’ राबविण्यात येणार आहे. पुढील १७० दिवस सर्व प्रवासी संघटना एकत्र काम करणार आहेत. तर प्रवाशांच्या मागण्या घेऊन मुंबई आणि दिल्ली स्थित अधिकारी, मुंबईतील सर्व खासदार, रेल्वे राज्य मंत्री, रेल्वे मंत्री यांची भेट घेणार आहोत.     - मधू कोटियन,     अध्यक्ष, मुंबई रेल्वे प्रवासी संघ

 

टॅग्स :मुंबई लोकलमुंबई उपनगरी रेल्वेमध्य रेल्वे