मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतून मिळणार घरे
By मनोहर कुंभेजकर | Published: June 13, 2023 01:40 PM2023-06-13T13:40:03+5:302023-06-13T13:40:37+5:30
आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी दिले.
मुंबई : मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे देण्यात येतील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी दिले.
भाजप नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी त्यांच्या कांदिवली पूर्व विधानसभेतील विविध प्रश्नाबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. घरा ऐवजी २५ ते ४० लाख रुपयांचा पर्यायही प्रकल्पग्रस्तांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी आमदार भातखळकर यांनी मतदारसंघातील विविध प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱ्या लोकांचा प्रश्न उपस्थित केला. विशेष नियोजन आराखड्यातील मागाठाणे-गोरेगाव या १२० फूट रस्त्याबाबतही चर्चा करण्यात आली. हा रस्ता येणाऱ्या एक ते दिड वर्षात पूर्ण करावा, असे आदेश उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. हा रस्ता पूर्ण होताच वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.
मतदारसंघातील महत्वाच्या समस्यांचा निपटारा केल्याबद्दल आमदार भातखळकर यांनी उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
या बैठकीला नगरविकास, गृहनिर्माण, महापालिका, म्हाडा, झोपडपट्टी पुनर्वसन, शिवशाही पुनर्वसन यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.