मुंबई : मुंबईच्या पूर्व किनारपट्टीला विकसित करण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे प्रस्तावित करण्यात आलेल्या मरीना प्रकल्प व कान्होजी आंग्रे बेटाला पर्यटन स्थळ बनवण्याच्या प्रकल्पाला केंद्र सरकारने तत्वत: मंजूरी दिल्याने या दोन्ही प्रकल्पांच्या कामाला वेग येणार आहे. प्रिन्सेस डॉक येथे ३६० कोटी खर्चून ३०० यॉटस क्षमतेचा मरीना प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये २०० छोटी जहाजे व १०० जहाजांची दुरुस्ती क्षमता असलेले केंद्र तयार करण्यात येणार आहे. मरीना प्रकल्पाला रस्त्याशी जोडण्यात येईल परिणामी तिथे जावून नागरिकांना बोट भाड्याने घेऊन पर्यटन करता येणे शक्य होईल.
केंद्र सरकारच्या अर्थ विषयक स्थायी समितीची तत्वत: मंजूरी मिळाल्याने या प्रकल्पाबाबत निविदा प्रक्रिया सुरु करण्यात येईल व पुढील ६ महिन्यात ही प्रक्रिया वेग घेईल, असे मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी स्पष्ट केले. २०२२ मध्ये हे काम पूर्ण होण्याची आशा त्यांनी व्यक्त केली. मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवरील प्रिन्सेस डॉक येथील सुमारे १२ एकर जागेवर हा प्रकल्प राबवण्यात येईल. यामध्ये जहाज थांबवण्यसाठी जागा उपलब्ध करण्यासोबत नागरिकांच्या सोयीसाठी हॉटेल, क्लब, अॅम्फीथिएटर, अशा विविध सुविधा पुरवण्यात येणार आहेत.
सध्या केरळ मधील कोची आंतरराष्ट्रीय मरीना प्रकल्प हा कार्यरत असलेला देशातील एकमेव मरीना प्रकल्प आहे. मुंबईत उभारण्यात येणारा हा प्रकल्प देशातील हा दुसरा मरीना प्रकल्प ठरेल. यामुळे पर्यटन वृृध्दीसह रोजगाराच्या संधीत देखील वाढ होईल, असा विश्वास भाटिया यांनी व्यक्त केला आहे. याशिवाय, कान्होजी आंग्रे बेट विकसित करण्याच्या प्रकल्पाला देखील मंजूरी मिळाली आहे. २३ किमी समुद्रात असलेल्या या बेटाला विकसित करुन पर्यटनाला प्रोत्साहन देण्यात येईल. कान्होजी आंग्रे बेट विकसित करुन पर्यटकांचा ओघ या ठिकाणी वळवण्यासाठी अनुकूल परिस्थिती तयार करण्यात येणार आहे.