Join us

राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचे हजारो स्क्रीनवर प्रक्षेपण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 9:45 AM

ढोल-ताशांच्या गजरात प्रवासी, भाविकांचा जल्लोष.

मुंबई : अयोध्येमध्ये सोमवारी पार पडलेल्या श्री राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण रेल्वे स्थानक आणि लोकल गाड्यांच्या स्क्रीनवर दाखविण्यात आले. याशिवाय विविध रेल्वे कर्मचारी संघटनांनीसुद्धा रेल्वे स्थानक परिसरात अयोध्या आणि प्रभू श्रीरामाचा देखावा तयार केला होता. त्यामुळे प्रवास करणारे प्रवाशांनी रेल्वे स्थानकात सोहळा आणि देखावा बघण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले.

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची देशाला उत्सुकता लागली होती. या क्षणाची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत होते. ऐतिहासिक क्षण पाहता यावा, यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने सोमवारी ५० रेल्वे स्थानक-टर्मिनसमध्ये आणि मुंबई उपनगरी रेल्वेगाड्यांमधील ९६० स्क्रीनमध्ये थेट प्रक्षेपण सोहळा दाखवण्यात आला. 

रामनामाचा जल्लोष :

  रेल्वे स्थानकातील प्रवाशांसह सफाई कर्मचारी, हमाल, रेल्वे सुरक्षा दलातील कर्मचारी आणि रेल्वे पोलिस यांनीही कर्तव्यावर सोहळ्याचा आनंद घेतला आहे. 

  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर रामाचे चलचित्र आणि भव्य रांगोळी साकारण्यात आली होती. ही रांगोळी पाहण्यासाठी आणि प्रभू रामाचे चलचित्र बघण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी उसळली होती. 

  अयोध्येतील मंदिरात प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर सीएसएमटी, चर्चगेट, दादर, वांद्रे, अंधेरी, कुर्ला, ठाणे, घाटकोपर, कल्याण स्थानकात ढोल-ताशांच्या गजरात प्रवासी आणि भाविकांनी जल्लोष केल्याचे चित्र दिसून आले.

टॅग्स :राम मंदिरअयोध्या