एमयूटीपी-३ मधील प्रकल्पांना मिळणार गती , मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 06:56 AM2020-07-10T06:56:21+5:302020-07-10T06:57:01+5:30
मुंबई व उपनगर रेल्वे सेवेमध्ये अधिक सुधारणा करण्याच्या अनुषंगाने मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा-३ (एमयूटीपी) या १०,९४७ कोटी रुपयांच्या प्रकल्पास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली होती.
मुंबई : एमयूटीपी-३ मधील प्रकल्पांना चालना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गुरुवारी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन, राज्य शासन, एमएमआरडीए व सिडको यांच्यात सामंजस्य करारनाम्यावर स्वाक्षरी करण्यात आली.
मुंबई व उपनगर रेल्वे सेवेमध्ये अधिक सुधारणा करण्याच्या अनुषंगाने मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा-३ (एमयूटीपी) या १०,९४७ कोटी रुपयांच्या प्रकल्पास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली होती. राज्य शासनाने रेल्वेच्या सहभागाने मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा-१ व टप्पा-२ च्या धर्तीवर ५०:५० आर्थिक सहभागातून हा प्रकल्प राबविण्यास मान्यता दिली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, अतिरिक्त मुख्य सचिव (नगरविकास) प्रवीण परदेशी, एमएमआरडीए आयुक्त आर. राजीव, एमआरव्हीसीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आर.एस. खुराणा, अतिरिक्त महानगर आयुक्त डॉ. सोनिया सेठी, एमआरव्हीसीचे वित्त संचालक अजित शर्मा उपस्थित होते. या वेळी या करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
करारामुळे या
प्रकल्पांना येणार वेग
पनवेल-कर्जत दरम्यान २८ किमी. नवीन उपनगरीय रेल्वे मार्गिका टाकणे : २७८३ कोटी
ऐरोली-कळवा दरम्यान ३.५ किमी. उन्नत रेल्वे मार्ग बांधणे : ४७६ कोटी
विरार-डहाणू दरम्यान ६३ किमी. रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण करणे (तिसरी-चौथी रेल्वे मार्गिका टाकणे) : ३५७८ कोटी
नवीन रेल्वेगाड्या खरेदी करणे (४७ रेक्स) : ३४९१ कोटी
मध्य व पश्चिम रेल्वे मार्गाच्या मध्य विभागात ट्रेस पास कंट्रोल : ५५१ कोटी. , तांत्रिक साहाय्य : ६९ कोटी