अॅप बेस टॅक्सी सेवेची भाडे निश्चिती लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 06:52 AM2017-08-11T06:52:28+5:302017-08-11T06:52:28+5:30
अॅप बेस टॅक्सीसह काळी-पिवळी टॅक्सीचे भाडेसूत्र ठरवण्यासाठी नेमलेल्या खटुआ समितीला ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. समितीच्या अहवालानंतर दोन महिन्यांमध्ये राज्य सरकार भाडेसूत्र ठरवणार आहे.
मुंबई : अॅप बेस टॅक्सीसह काळी-पिवळी टॅक्सीचे भाडेसूत्र ठरवण्यासाठी नेमलेल्या खटुआ समितीला ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. समितीच्या अहवालानंतर दोन महिन्यांमध्ये राज्य सरकार भाडेसूत्र ठरवणार आहे. परिणामी, समितीच्या मुदतवाढीमुळे अॅप बेस टॅक्सीसह काळी-पिवळी टॅक्सी सेवेचे भाडेसूत्र लांबणीवर पडणार आहे.
राज्य सरकारने बी. सी. खटुआ यांच्या अध्यक्षतेखाली २०१६ साली समिती नेमली होती. या समितीला राज्य सरकारने अॅप बेस टॅक्सीसह काळी-पिवळी टॅक्सी आणि रिक्षा यांचे भाडेसूत्र ठरविण्यासाठी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर इलेक्ट्रिक टॅक्सीबाबतचे भाडेसूत्र ठरविण्यासंबंधी सूचना केल्या आहेत. उच्च न्यायालयाने जुलैअखेर अहवाल सादर करण्याचे आदेश समितीला दिले होते. अध्यक्षांच्या आजारपणामुळे समितीने मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. समितीच्या विनंतीनंतर ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे समजते.
समिती अहवालाचे काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. महिना अखेरपर्यंत अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाडेसूत्र निश्चित करण्यासाठी समितीने विविध प्रवासी संघटना आणि विविध शहरांतील संबंधितांची भेट घेऊन भाडेसूत्राबाबत बैठका घेतल्या आहेत.