प्रादेशिक परिवहनची भरती लांबणीवर
By Admin | Published: July 4, 2014 03:47 AM2014-07-04T03:47:47+5:302014-07-04T03:47:47+5:30
प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ठाणे, वसई, पनवेल कार्यालयांसाठी आवश्यक लिपिक टंकलेखकांच्या भरतीचा सावळा गोंधळ अद्याप सुरूच आहे
नामदेव पाषाणकर, घोडबंदर
प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ठाणे, वसई, पनवेल कार्यालयांसाठी आवश्यक लिपिक टंकलेखकांच्या भरतीचा सावळा गोंधळ अद्याप सुरूच आहे. त्यामुळे असंख्य उमेदवारांना प्रतीक्षा यादीत तिष्ठत राहावे लागते. पाच महिन्यांच्या कालावधीनंतरही भरतीची प्रक्रिया संपत नसल्याने उमेदवारांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
परिवहन कार्यालयाने ८ फेब्रुवारी २०१४ रोजी आॅनलाइन भरतीचे काम हाती घेतले होते. त्यानंतर, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण पुढे करून या प्रक्रियेवर काही कार्यवाही झाली नव्हती. या भरतीच्या वेळी ठाणे जिल्हाधिकारी, उत्पादन शुल्क खात्याने सुरू केलेली भरती प्रक्रिया पूर्ण झाली असताना प्रादेशिक परिवहन कार्यालयाला मात्र भरती प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. तसेच उमेदवारांच्या भरतीचा निकालही जाहीर करता आला नाही.
यासंदर्भात परिवहन आयुक्त कार्यालयाकडे विचारणा केली असता आयुक्त सी.एम. मोरे यांच्याकडील पदभार अप्पर परिवहन आयुक्तांकडे सोपविण्यात आला आहे. अद्याप यासंदर्भात कोणतेही आदेश प्रशासनाला देण्यात आले नाहीत. तसेच अंतिम कार्यवाही पूर्ण होत नाही, तोवर कोणालाही भरती संदर्भातील माहिती देऊ नये, असे आदेश देण्यात आले आहेत. माहिती हवी असल्यास माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्ज केल्यास भरती प्रक्रियेची माहिती देण्यात येईल, असेही सांगण्यात आले.