लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पुढे ढकलण्यात आलेली १४ मार्चची पूर्वपरीक्षा आठवडाभरात होईल आणि शुक्रवारी तिची तारीख जाहीर केली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्री राज्यातील जनतेशी संवाद साधताना सांगितले.
राज्यात कोराेनाचा संसर्ग वाढत असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध आल्याने परीक्षा घेणे योग्य नाही, असे राज्याच्या पुनर्वसन विभागाने कळविल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १४ मार्च रोजी होणारी पूर्वपरीक्षा पुढे ढकलली. गेल्या वर्षभरापासून ही परीक्षा वारंवार रद्द होत असल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी राज्यभर निदर्शने केली. पुण्यात शेकडो विद्यार्थी नवी पेठेत ठिय्या देऊन बसल्याने या भागात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तो वेळीच अटोक्यात आणला.
विद्यार्थ्यांच्या निदर्शनांची तत्काळ दखल घेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी रात्री साडेआठ वाजता फेसबुकच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले, ही परीक्षा गेल्या वर्षी दिवाळीपूर्वी होणार होती. मात्र ती त्यावेळी पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्याच वेळी आता पुन्हा परीक्षा पुढे ढकलली जाणार नाही, असे मी स्पष्ट केले होते. त्यानुसार १४ मार्च ही तारीख जाहीर करण्यात आली होती. परंतु राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. ज्या शासकीय यंत्रणेमार्फत ही परीक्षा घेतली जाते ती यंत्रणा कोरोना नियंत्रण आणि लसीकरणात व्यस्त आहे. परंतु विद्यार्थ्यांच्या भावनांशी मी सहमत आहे. मी आजच राज्याचे मुख्य सचिव तसेच एमपीएससीला सूचना दिलेल्या आहेत की परीक्षेच्या तारखांचा घोळ संपवा. उद्या परीक्षेची तारीख जाहीर करा. ही तारीख येत्या आठ दिवसातील असेल. कोणी भडकवते म्हणून भडकून जाऊ नका.
महसूल व इतर विभागाचे कर्मचारी परीक्षेच्या कामात असतात. पेपर वाटणे, नंबर बघून देणे, पेपर गोळा करणे, सुपरव्हिजन यासाठी कर्मचारीवर्ग लागतो. या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी झाली आहे का, ती निगेटिव्ह आहे का, हे बघावे लागेल. कोरोना लस घेतलेलेच कर्मचारी परीक्षेच्या कामात असावेत अशा माझ्या सूचना आहेत. म्हणजे विद्यार्थी दडपणाखाली राहणार नाहीत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. विद्यार्थ्यांच्या गैरसाेयीबद्दल मुख्यमंत्र्यांनी दिलगिरीही व्यक्त केली.
वारंवार चालढकल का?n गतवर्षी एप्रिल २०२० मध्ये राज्यसेवा व इतर परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या. n त्यानंतर मराठा आरक्षणावर स्थगिती येण्यापूर्वी एमपीएससीची पूर्वपरीक्षा ११ ऑक्टोबरला, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा १ नोव्हेंबर रोजी आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब ची परीक्षा २२ नोव्हेंबर रोजी होणार होती. मात्र, या तिन्ही परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या. n त्यानंतर परीक्षा घेण्यासाठी हाेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार, एमपीएससी पूर्वपरीक्षा १४ मार्च, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा २७ मार्च, तर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब ची परीक्षा ११ एप्रिल रोजी होईल, असे आयोगाने स्पष्ट केले होते. n मात्र १४ मार्चची पूर्वपरीक्षा अवघ्या तीन दिवसा़ंवर आलेली असताना काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा पुढे ढकलण्यात आली.
उमेदवारांच्या संतप्त प्रतिक्रियाअभियांत्रिकी सेवा व अराजपत्रित गट ब या परीक्षेबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. यावर परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
मदत व पुनर्वसन विभागाने १० मार्च रोजी दिलेल्या पत्रानुसार १४ मार्चची पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली, असे एमपीएससीने म्हटले आहे. परंतु मला न विचारता सचिव स्तरावर परस्पर घेतलेला हा निर्णय आहे. मला अंधारात ठेवले. याची चौकशी हाेईल. विजय वडेट्टीवार, मंत्री, मदत व पुनर्वसन
सरकारशी संपर्क ठेवून योग्य नियोजन करून परीक्षा घेण्याची एमपीएससी प्रमुखांची जबाबदारी होती, त्यांनी ती योग्यरीतीने पार पाडली नाही. सरकार विद्यार्थ्यांसोबत आहे. बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री
सहाव्यांदा लांबणीवरकोरोनामुळे गेल्या वर्षभरात तब्बल सहा वेळा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. ५ एप्रिल २०२० २६ एप्रिल २०२० १३ सप्टेंबर २०२० २० सप्टेंबर २०२० ११ ऑक्टो. २०२० १४ मार्च २०२१
परीक्षेच्या तारखांचा घोळ संपवा. उद्या परीक्षेची तारीख जाहीर करा. ही तारीख येत्या आठ दिवसांतील असेल. उद्धव ठाकरे
एमपीएससीच्या परीक्षा सातत्याने पुढे ढकलण्यामुळे वर्षानुवर्षे त्यासाठी तयारी करणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण होते आहे. त्यामुळे परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय तत्काळ रद्द करावा. देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते