लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : जूनचा पहिला आठवडा उलटून गेला तरीही पावसाचा पत्ता नाही. वेधशाळेने पाऊस लांबणार असल्याची माहिती दिल्याने पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या नागरिकांचा हिरमोड झाला आहे. त्यातच दिवसेंदिवस आग ओकणाऱ्या सूर्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांनी गाळ गाठायला सुरुवात केली असून मुंबईकरांची भिस्त आता राखीव पाणीसाठ्यावर आहे.
वाढत्या तापमानामुळे मुंबईची तहान भागविणाऱ्या तलावांमधील पाण्याची पातळी देखील आटत चालली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये १०.३३ टक्केच पाणी शिल्लक आहे. कमी पाणीसाठा शिल्लक असला तरी पालिकेने आता अपर वैतरणा आणि भातसा धरणातील राखीव पाणीसाठा वापरायला सुरुवात केली आहे.
हे तलाव भागवतात मुंबईची तहान
मुंबईकरांची तहान तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा, अपर वैतरणा, तुळशी, विहार व भातसा या तलावांद्वारे भागविली जाते. वाढता उन्हाळा पाहता मुंबईला दररोज पाणीपुरवठा करणाऱ्या या तलावातून उपसा व पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होते. या सात तलावातून मुंबईला दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. यातील तुळशी व विहार ही धरणे सोडली, तर इतर धरणे मुंबईपासून सुमारे १४० किलोमीटर अंतरावर आहेत. या धरणांतून वाहिन्यांद्वारे मुंबईत पाणी आणले जाते.
१०.३३% पाणी शिल्लक
१० जून रोजी रोजी या तलावात १०.३३ टक्के पाणीसाठा शिल्लक असून याच दिवशी २०२२ मध्ये १४ टक्के साठा शिल्लक होता. तर, याच दिवशी २०२१ मध्ये १२.६८ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता.
पाणी राखीव १७.५८%
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात पाणी कमी असले तरी पाणीटंचाई जाणवत नाही. पालिकेकडून सरकारच्या भातसा आणि अपर वैतरणा तलावातून पाणी वापरायला सुरुवात केली आहे. एकूण साठा १७.५८ टक्के शिल्लक आहे.
तलाव (शिल्लक पाणीसाठा टक्क्यांमध्ये)अपर वैतरणा ७५.०७(राखीव साठा)मोडक सागर २२.६६तानसा २१.२४मध्य वैतरणा १३.७१भातसा ७.५२विहार २३.७७तुळसी २९.३८