अल्पेश करकरे
मुंबई : फेब्रुवारी महिना प्रेमाला समर्पित आहे. 7 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला आहे. या दिवसांत छान गुलाबी थंडीचे हवामान असते. फेब्रुवारी महिना प्रेमिकांना प्रेम व्यक्त करण्याची संधी आणि वेळ दोन्ही देतो. आठवडाभर म्हणजे सात दिवस प्रेमी युगुल आपले प्रेम वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करतात. त्यातच आता डेस फक्त तरुणाईच नाही, तर राजकारणी ही आपल्या पध्दतीने साजरा करतायत. व्हॅलेंटाईनमधील हे दिवस राजकारण्यांनाही भुरळ घालत आहेत. आज राष्ट्रवादीकडून या सात दिवसातील महत्त्वाचा असणारा "प्रॉमिस डे" एक वेगळी मोहीम राबवत समाज माध्यमावर साजरा होताना पाहायला मिळतोय.
राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी आज प्रॉमिस डे! निमित्ताने ट्विट करत म्हटले की, 'आजच्या या दिनी माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि आदरणीय शरद पवार साहेबांना शब्द आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, वाडी, वस्तीपर्यंत अत्यंत मजबुतीने बांधण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे.'
व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला की सात दिवसात प्रेम व्यक्त करण्यासाठी जे काही आवश्यक आहे, ते या सात दिवसांत व्यक्त केलं जातं .त्यात आज प्रॉमिस डे असल्याने प्रत्येक नात्यात अनेक वचने असतात, काही पूर्ण होतात, काही अपूर्ण राहतात. मात्र तरीही यादिवशी जोडीदाराला सहकार्याला छोटी-छोटी वचने दिली जातात .तसच वचन आज जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना ,पदाधिकाऱ्यांना आणि शरद पवारांना दिलं आहे. त्यावर अनेक कार्यकर्त्यांनी पाटील यांना रिप्लाय करत प्रॉमिस दिलंय.तर काहींनी यावर टीका केलीय .