जमिनीच्या वादातून तिघांचे पाय तोडले
By admin | Published: January 20, 2015 01:46 AM2015-01-20T01:46:45+5:302015-01-20T01:46:45+5:30
मुंबईहून आलेल्या सुमारे साठ जणांच्या जमावाने साखर झोपेत असलेल्या घरातील महिलांसह पुरुषांनाही अमानुष मारहाण केली.
खेड : मुंबईहून आलेल्या सुमारे साठ जणांच्या जमावाने साखर झोपेत असलेल्या घरातील महिलांसह पुरुषांनाही अमानुष मारहाण केली. यामध्ये १८ जण जखमी झाले असून, त्यातील गंभीर ८ जणांना रत्नागिरीत हलवले आहे. या हल्लेखोरांनी धारदार हत्यारांनी तिघांचे दोन्ही पाय तोडले. ही घटना सोमवारी पहाटे तालुक्यातील कोंडीवली शिंदेवाडी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी ६५ जणांना अटक केली आहे़
जमीन मोजल्यानंतर हनुमंत सखाराम यादव (७०) यांच्या मालकीचा गोठा आरोपींपैकी काहींच्या मालकीच्या जमिनीमध्ये आढळला. त्यामुळे यादव यांनी हा गोठा रिकामा करण्यास सांगितले. मात्र आरोपींनी त्यांना जुमानले नाही. त्याचदरम्यान, आणखी एक घटना घडली, सविता गणेश शिंदे, काळुबाई लक्ष्मण उतेकर आणि विद्या शांताराम उतेकर यांना १६ जानेवारीला मध्यरात्रीच्या सुमारास तेथे राहणारे रवींद्र दगडू शिंदे यांच्यासह अन्य २० जणांनी मारहाण केली होती. याबाबत खेड पोलीस ठाण्यात फिर्यादही दाखल करण्यात आली होती.
पोलिसांनी चौकशी सुरू केली असतानाच या मारहाणीचा वचपा काढण्यासाठी सोमवारी सकाळी यादव गटातील ६५ जणांच्या टोळक्याने हा ह्ल्ला केला. हल्लेखोर तरुण पहाटेच्या कोकण एक्स्प्रेसने कोंडीवली येथे आले होते, तर खेड येथून त्यांनी येथील टेम्पो ट्रॅव्हलर भाड्याने घेतली आणि ते कोंडीवली गावी पोहोचले. यावेळी पहाटेच्या सुमारास झोपेत असतानाच ही मारहाण झाल्याने सर्वजण भांबावून गेले होते.
काहींवर कोयत्याने आणि गुप्तीने वार करण्यात आले आहेत, तर काहींना बांबूने मारहाण करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. हल्लेखोरांनी नजीकच्या दुचाकी आणि रिक्षाही जाळली, तसेच दुकानातील सामानाची नासधूस केली.
या हल्ल्यात कैलास शिंदे (४०), परशुराम शिंदे (५२), संजय शिंदे (३५), सारिका शिंदे (३२), विनायक चव्हाण (४५), मधू चव्हाण (४२), बळिराम शिंदे (४८), रवींद्र शिंदे (४०) हे आठजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात, तर दहाजणांना कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर गुप्तीने वार करण्यात आले असून, कैलास शिंदे, बळिराम शिंदे आणि रवींद्र शिंदे यांचे दोन्ही पाय तुटले आहेत. (प्रतिनिधी)
हल्लेखोरांमधील आरोपी शांताराम उतेकर हा गुंड प्रवृत्तीचा आहे. त्याच्यावर याअगोदर चार गुन्हे दाखल करण्यात आल्याचे समजते. याशिवाय त्याला तडिपार करण्यात आल्याचे जखमींच्या नातेवाइकांकडून सांगण्यात आले आहे. हल्लेखोरांमध्ये राजाराम भातोसे, रामचंद्र शिंदे, जनार्दन फालके, संजय यादव, गणेश शिंदे, दिनेश शिंदे यांच्यासह ६५ आरोपींचा सामावेश आहे. त्यांच्यावर जमाव करून मारहाण करणे, खुनाचा प्रयत्न आणि अशांतता निर्माण करणे, आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.