दोषमुक्त झालेल्या २५ सहायक निरीक्षकांना पदोन्नती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 06:07 AM2019-09-16T06:07:22+5:302019-09-16T06:07:41+5:30
पोलीस दलात कार्यरत असताना विविध कारणांमुळे खातेनिहाय चौकशीत अडकलेल्या राज्यातील २५ सहायक पोलीस निरीक्षकांना बढती देण्यात आली आहे.
मुंबई : पोलीस दलात कार्यरत असताना विविध कारणांमुळे खातेनिहाय चौकशीत अडकलेल्या राज्यातील २५ सहायक पोलीस निरीक्षकांना बढती देण्यात आली आहे. त्यांना देण्यात आलेल्या शिक्षेत बदल केल्याने पदोन्नतीतील अडसर दूर झाल्याने त्यांना निरीक्षक बनविण्यात आले आहे. पोलीस मुख्यालयातून त्यांच्या बढतीचे आदेश नुकतेच बजावण्यात आले आहेत.
राज्यातील सुमारे ४५० सहायक निरीक्षकांना १० जूनला निरीक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. त्यावेळी सेवाज्येष्ठतेच्या आधारे त्यासाठी पात्र असतानाही विविध कारणास्तव त्यांच्यावरील दोषारोपामुळे त्यांना बढतीपासून वंचित ठेवण्यात आले होते. त्यातील कमी स्वरूपाची शिक्षा झालेल्या २५ सहायक निरीक्षकांच्या महाराष्टÑ नागरी सेवा शर्तीच्या नियमानुसार बदल करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या बढतीतील अडसर दूर झाल्याने पदोन्नती देण्यात आली आहे. संबंधितांना बदलीच्या जागी हजर होण्यासाठी तत्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांनी घटकप्रमुखांना दिले आहेत.