पनवेल : पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात प्रचाराचा चांगलाच जोर वाढला आहे. उमेदवारांनी प्रत्यक्ष भेटींवर जोर देत गावागावातून, रहिवासी संकुले, सोसायट्यांमधून प्रत्यक्ष भेटींवर भर दिला आहे. पनवेल तालुका हा एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाचा मजबूत गड मानला जात असे. या ठिकाणी मतदारांनी सातत्याने लालबावट्याला पसंती दिली. मात्र २००९ पासून मतदारांनी आपला कौल बदलला. रामशेठ ठाकूर यांच्या करिष्मा चालला आणि त्यांनी प्रशांत ठाकूर यांना विजयी केले. तब्बल अर्धे शतक राज्य केल्यानंतर लालबावट्याला आपला गड गमवावा लागला तेही रामशेठ यांच्यामुळे. जिकडे ठाकूर तिकडे विजय असे समीकरण गेली काही वर्षांपासून पनवेलमध्ये झाले आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही रामशेठ रायगडचे खासदार झाले. टोलचा प्रश्न सत्ताधारी आमदार असतानाही मार्गी लावला नाही म्हणून क्षणाचा विलंब न लावता प्रशांत ठाकूर यांनी पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेऊन भाजपात प्रवेश केला. त्यांच्याबरोबरच शेकडो कार्यकर्तेही भाजपात प्रवेश करीत असल्याने शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कमळ फुलू लागले आहे. याचा विरोधकांनी एक प्रकारे धसका घेतला आहे. प्रशांत ठाकूर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी जवळपास सर्व गावे पिंजून काढली आहेत. ढोल, ताशे गजरात ठाकूर यांची गावातील गल्लोगल्ली मिरवणूक काढण्यात येत आहे. याशिवाय घरोघरी भेटी देण्यावरही त्यांचा भर आहे. दररोज विरोधी पक्षातील अनेक कार्यकर्ते भाजपात सहभागी होत असून अनेक ठिकाणी बाईक रॅली, प्रचार फेऱ्या काढण्यात येत आहेत. शनिवारी त्यांनी भिंगारी, काळुंदे, अजिवली, अरिवली या गावात जावून गाठीभेटी घेतल्या. (वार्ताहर)
पनवेल ग्रामीणमध्ये प्रचाराचा जोर
By admin | Published: October 05, 2014 11:00 PM