मुंबई : गेल्या काही वर्षांत मुंबई महापालिकेतील अनेक मोठे घोटाळे उघड झाले. या घोटाळ्यांमध्ये ठपका ठेवून खातेनिहाय चौकशी सुरू असलेल्या अभियंत्यांना त्यांच्या या कामगिरीसाठी कारवाईऐवजी चक्क बढती मिळणार आहे. पालिका महासभेच्या मंजुरीनंतर यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
या पदोन्नतीवर विरोधी पक्षाने आक्षेप घेतला आहे. नालेसफाई, कचरा, भूखंड आणि आता ई घोटाळ्यात मोठ्या प्रमाणात अभियंते गुंतले आहेत. २०१४मध्ये झालेल्या ई घोटाळ्यात एक सहायक आयुक्त, ८ कनिष्ठ अभियंते, ३७ दुय्यम अभियंते, एक सहायक अभियंता आणि १६ कार्यकारी अभियंते दोषी आढळून आले. ६०० कोटींच्या या घोटाळ्यात दोषी अभियंत्यांची एक ते पाच वेतनवाढ रोखण्यात आली आहे. मात्र नुकतेच जाहीर झालेल्या संभाव्य पदोन्नतीच्या यादीत यापैकी काही अभियंत्यांचे नाव आहे.
ही धक्कादायक बाब निदर्शनास आणून विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे निषेध नोंदविला आहे. या अभियंत्यांची चौकशी पूर्ण होऊन त्यांची निर्दाेष मुक्तता होईपर्यंत त्यांना पदोन्नती देऊ नये, अशी विनंती विरोधी पक्षाने आयुक्तांकडे केली आहे.