ईशान्य मुंबईत उमेदवारीपूर्वीच ठरली प्रचाराची रणनीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 03:49 AM2019-04-01T03:49:09+5:302019-04-01T03:49:41+5:30
नाराज शिवसेनेकडे राष्ट्रवादीची सेटिंग : वादाकडे दुर्लक्ष
मुंबई : उत्तर पूर्व मुंबईत भाजपच्या उमेदवारीवरुन सुरु असलेल्या वादाकडे दुर्लक्ष करत भाजपने प्रचाराची रणनीतीही ठरवली आहे. यात, संभाव्य उमेदवारांना कामाला लावण्यात आल्याचेही दिसून आले. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने मदतीसाठी नाराज शिवसेनेकडे मदत मागितल्याची चर्चा रंगली आहे.
निवडणूक संचलन समितीच्या पहिल्या सभेत, आमदार प्रकाश मेहतांकडे ईशान्य मुंबईचे पालकत्त्व, तर प्रवीण छेडा आणि मनोज कोटक यांच्याकडे गुजराती भाषिकांसह व्यावसायिकांचे समन्वयक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. घाटकोपरच्या हॉटेलमध्ये शुक्रवारी रात्री ही बैठक पार पडली. त्यात सध्याचे खासदार किरीट सोमय्यांसह भाजपचे आमदार, नगरसेवक, सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सोमय्यांनी संभाव्य उमेदवारांना कामाला लावलेले दिसून आले. विशेष म्हणजे आमदार सरदार तारासिंग या बैठकीला उपस्थित नव्हते.
सोमय्या यांना उमेदवारी मिळणार की नाही, हे ठरलेले नसतानाच त्यांनीच या जबाबदाऱ्या वाटण्यात पुढाकार घेतल्याची बातमी फुटल्याने शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. कोअर कमिटी स्थापन करत, प्रत्येक सभासदाला विधानसभेनुसार जबाबदारीचे वाटप करण्यात आले. निधीचा खर्च, साहित्य वितरण कार्यालय, समन्वयाचे कामाबरोबरच त्यांनी लाभार्थी सेंटरदेखील उभारले आहे. याची जबाबदारी मेधा सोमय्यांवर सोपविण्यात आली. धनगर, मातंग, वंजारी वाल्मिकी अशा समाजगटांसाठी पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यातही, कोकण, गुजरात, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय महिलांचे वेगवेगळे ग्रूप प्रचारात उतरविण्यात येणार आहेत. मदतीसाठी गुजरात, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातूनही येणाऱ्यांसाठी विशेष व्यवस्था आहे. ओबीसींसह खासगी क्षेत्र आणि गृहसंस्था, पतपेढ्यांची जबाबदारी चौघाच्या खांद्यावर, तर गुजराती भाषकांबरोबरच व्यावसायिक, व्यापारी संघटनेसाठी चौघांची नेमणूक करण्यात आली.
आमदारांच्या घरात टिक टिक
सोमय्या विरुद्ध शिवसेना हा वाद सुरु असताना, राष्ट्रवादीच्या उमेदवाराने शिवसेना पदाधिकाºयांकडे लॉबिंग सुरु केली आहे. नुकतीच सेनेच्या आमदाराच्या घरात दोन तास बैठक झाल्याचे समजते.