Join us

पदोन्नती आरक्षणाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात! बैठकीसाठी १३ नोव्हेंबरचा अल्टीमेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 12:02 AM

शासकीय, निमशासकीय कर्मचारी व अधिका-यांच्या पदोन्नतीतील आरक्षणाबाबत, लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी, महाराष्ट्र राज्य आरक्षण बचाव मध्यवर्ती कृती समितीला दिले आहे.

मुंबई : शासकीय, निमशासकीय कर्मचारी व अधिका-यांच्या पदोन्नतीतील आरक्षणाबाबत, लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी, महाराष्ट्र राज्य आरक्षण बचाव मध्यवर्ती कृती समितीला दिले आहे. कृती समितीच्या नेतृत्वाखाली हजारो कर्मचा-यांनी आझाद मैदानात मंगळवारी धडक मोर्चा काढला होता.१३ नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन पदोन्नती आरक्षणासंदर्भात आश्वासित केले नाही, तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा कृती समितीने दिला आहे.कृती समितीचे अध्यक्ष रमेश सरकटे यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाने पदोन्नती आरक्षण रद्दबातल करण्याचा निर्णय दिल्याने, संपूर्ण समाजाचे नुकसान होणार आहे. त्यामुळे सरकार या प्रकरणी गंभीर नसल्याचा समज जनमाणसात झाला आहे. याचाच जाब विचारण्यासाठी हजारो शासकीय व निमशासकीय कर्मचारी मंगळवारी आझाद मैदानात एकवटले. त्याची दखल घेत, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी कृती समितीच्या शिष्टमंडळाची या प्रश्नी भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली.या बैठकीत बडोले यांनी पदोन्नती आरक्षणासंदर्भातील सर्व पुरावे राज्य सरकारने जमा केल्याचे सांगितले. सोबतच या प्रकरणी राज्य शासनाची बाजू मांडण्यासाठी राज्य सरकारने ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांची नियुक्ती केल्याचीही माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली. १३ नोव्हेंबरआधी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासनही बडोले यांनी यावेळी दिले.

प्रकाश आंबेडकरांनी असाही साधला संवाद!भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थितांशी फोनवरून संवाद साधला. लोकशाही आणि कायदेशीर मार्गाने संविधानाने दिलेला हक्क मिळविल्याशिवाय शांत राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले. गरज पडल्यास सर्व समाजाने रस्त्यावर उतरण्याचे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :देवेंद्र फडणवीस